West Indies vs India 5th T20I Update: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना लॉडरहिल, फ्लोरिडा येथे संपन्न झाला. ही मालिका सध्या २-२ अशी बरोबरीत होती. आजच्या निर्णायक पाचव्या सामन्यात वेस्ट इंडीजने टीम इंडियावर आठ विकेट्सने दणदणीत विजय मिळवत ३-२ने मालिका जिंकली. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली हा लाजीरवाणा विक्रम नोंदवला गेला आहे. २०१६नंतर टीम इंडियाने वेस्ट इंडीजविरुद्ध मालिका गमावली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वेस्ट इंडिजने भारतावर आठ गडी राखून मात केली

वेस्ट इंडिजने पाच सामन्यांच्या टी२०मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या निर्णायक सामन्यात भारताचा आठ गडी राखून पराभव केला. या विजयासह वेस्ट इंडिजने ही टी२० मालिकाही ३-२ अशी खिशात घातली आहे. लॉडरहिल, फ्लोरिडा येथे खेळल्या गेलेल्या पाचव्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकात ९ गडी गमावून १६५ धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजने १८ षटकांत दोन गडी गमावून लक्ष्य गाठले. वेस्ट इंडिज संघाने पहिले दोन टी२० जिंकले. यानंतर टीम इंडियाने पुनरागमन करत तिसरा आणि चौथा टी२० जिंकला. मात्र, पाचवी टी२० गमावण्याबरोबरच भारतीय संघाने मालिकाही गमावली. निकोलस पूरन आणि ब्रँडन किंग यांनी वेस्ट इंडिजसाठी १०७ धावांची भागीदारी करून भारताला सामना आणि मालिका जिंकण्यापासून दूर ठेवले. ब्रँडन किंग ५५ चेंडूत ८५ धावा करून नाबाद राहिला.

भारतीय डाव

प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. भारताने पहिल्याच षटकात यशस्वी जैस्वालची विकेट गमावली होती. त्याला चार चेंडूत पाच धावा करता आल्या. यानंतर शुबमन गिलही तिसऱ्या षटकात नऊ चेंडूत नऊ धावा काढून पॅव्हेलियनमध्ये गेला. अकील हुसेनने दोघांनाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले. १७ धावांत दोन गडी गमावल्यानंतर भारतीय डाव तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी सांभाळला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी केली. ही भागीदारी रोस्टन चेसने स्वतःच्याच चेंडूवर उत्कृष्ट झेल घेत तोडली. त्याच्याच चेंडूवर त्याने तिलकचा झेल घेतला. तिलक १८ चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने २७ धावा करून बाद झाला.

सूर्यकुमार यादवचे अर्धशतक व्यर्थ

दरम्यान, सूर्यकुमार यादवने टी२० आंतरराष्ट्रीय डावातील १५वे अर्धशतक झळकावले. त्याने ३८चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. अल्झारी जोसेफच्या चेंडूवर षटकार ठोकत सूर्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. संजू सॅमसन, कर्णधार हार्दिक पांड्या पुन्हा एकदा अपयशी ठरले. सॅमसन नऊ चेंडूंत दोन चौकारांच्या मदतीने १३ धावा करून बाद झाला तर हार्दिक १८ चेंडूंत एका षटकाराच्या मदतीने १४ धावा करून बाद झाला. अक्षर पटेल १० चेंडूत १३ धावा करून बाद झाला तर अर्शदीप सिंगने चार चेंडूत आठ धावा केल्या. कुलदीप यादवला खातेही उघडता आले नाही. सॅमसन, हार्दिक, अर्शदीप आणि कुलदीप यांना शेफर्डने बाद केले. अशा प्रकारे टीम इंडियाला १६५ धावा करता आल्या. शेफर्डशिवाय अकील हुसेन आणि होल्डरने प्रत्येकी दोन गडी बाद केले. रोस्टन चेसला एक विकेट मिळाली.

हेही वाचा: IND vs WI 5th T20: सूर्याची एक चूक अन् टीम इंडियाला भुर्दंड? रिव्ह्यू न घेणे पडले शुबमन गिलला महागात

भारताचा वेस्ट इंडिज दौराही या सामन्याने संपला. भारताने दोन सामन्यांची कसोटी मालिका १-० अशी जिंकली. पहिली कसोटी भारताने एक डाव आणि १४१ धावांनी जिंकली होती. दुसरी कसोटी अनिर्णित राहिली. यानंतर टीम इंडियाने तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका २-१अशी जिंकली. भारताने पहिला एकदिवसीय सामना ५ विकेट्सने जिंकला. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विंडीजने दमदार पुनरागमन करत ६ गडी राखून विजय मिळवला. भारताने तिसरी वनडे विक्रमी २०० धावांनी जिंकली. वेस्ट इंडिजने पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील पहिला सामना चार धावांनी आणि दुसरा टी२०दोन गडी राखून जिंकला. भारताने तिसरा टी२०सात गडी राखून आणि चौथा टी२०नऊ गडी राखून जिंकला. आता भारतीय संघ आयर्लंडविरुद्ध तीन सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहे. १८ऑगस्टपासून सुरू होणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wi vs ind 5th t20 west indies beat india by eight wickets in fifth t20 team india also lost t20 series avw