पोर्ट ऑफ स्पेन : वेस्ट इंडिजविरुद्ध शुकवारपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेत प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारताच्या युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:ला सिद्ध करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. शिखर धवनच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचे हा सामना जिंकून मालिकेत विजयी सलामी नोंदवण्याचे लक्ष्य असेल.

गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे व्यग्र वेळापत्रक आणि विशेषत: एकदिवसीय क्रिकेटचे भवितव्य, याबाबत बरीच चर्चा केली जात आहे. इंग्लंडचा तारांकित अष्टपैलू बेन स्टोक्सने सततच्या क्रिकेटमुळे शरीरावर पडणाऱ्या ताणाच्या कारणास्तव एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तसेच अन्य काही माजी क्रिकेटपटूंनीही कसोटी आणि ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या तुलनेत एकदिवसीय क्रिकेट मागे पडल्याचे म्हटले आहे. मात्र, भारताच्या युवा क्रिकेटपटूंसाठी विंडीजविरुद्धची ही एकदिवसीय मालिका महत्त्वपूर्ण ठरू शकेल.

कर्णधार रोहित शर्मासह विराट कोहली, जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, ऋषभ पंत आणि हार्दिक पंडय़ा यांसारख्या प्रमुख भारतीय खेळाडूंना एकदिवसीय मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्यांच्या अनुपस्थितीत युवा खेळाडूंना सर्वांचे लक्ष वेधून घेण्याची संधी मिळेल.

हुडावर नजर

इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील निराशाजनक कामगिरीनंतर कर्णधार शिखर धवन विंडीजविरुद्ध मोठी खेळी करण्यासाठी उत्सुक असेल. त्याच्या साथीने सलामीसाठी भारताकडे ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल आणि इशान किशन यांचे पर्याय उपलब्ध आहेत. किशन यष्टीरक्षणाची धुरा सांभाळेल. मधल्या फळीत श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव या मुंबईकरांसह दीपक हुडाकडून दमदार कामगिरीची अपेक्षा आहे. डावखुऱ्या रवींद्र जडेजाचा अष्टपैलू योगदानाचा प्रयत्न असेल. जडेजा आणि यजुर्वेद्र चहल या अनुभवी जोडीवर फिरकीची मदार आहे. वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णा आणि मोहम्मद सिराज यांनी प्रभावी मारा करणे गरजेचे आहे.

होल्डर, होपवर भिस्त

विंडीजच्या संघाची प्रामुख्याने अष्टपैलू जेसन होल्डर, कर्णधार निकोलस पूरन आणि सलामीवीर शे होपवर भिस्त आहे. होपने गेल्या १० पैकी दोन डावांमध्ये शतक झळकावले आहे. मधल्या फळीत पूरनसह शमार ब्रूक्स आणि रोव्हमन पॉवेल यांच्याकडे मोठे फटके मारण्याची क्षमता आहे. विंडीजने नुकतीच झालेली बांगलादेशविरुद्धची एकदिवसीय मालिका ०-३ अशी गमावली. या मालिकेत त्यांना होल्डरची उणीव जाणवली. मात्र, भारताविरुद्ध त्याचे विंडीजच्या संघात पुनरागमन होणार आहे. गोलंदाजीत होल्डरसह अल्झारी जोसेफ आणि जेडन सिल्स यांच्यापुढे भारतीय फलंदाजांना रोखण्याचे आव्हान असेल. फिरकीची धुरा अकिल हुसेन सांभाळेल.

संघ

* भारत : शिखर धवन (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), शार्दूल ठाकूर, यजुर्वेद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.

*वेस्ट इंडिज : निकोलस पूरन (कर्णधार), शे होप (उपकर्णधार), शमार ब्रूक्स, ब्रँडन किंग, कायले मेयर्स, केसी कार्टी, रोव्हमन पॉवेल, जेसन होल्डर, अकिल हुसेन, अल्झारी जोसेफ, गुडाकेश मोटी, कीमो पॉल, जेडन सील्स.

Story img Loader