WI vs NZ New Zealand Womens beat West Indies Womens by 8 runs : यूएईमध्ये आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२४ चा दुसरा सेमीफायनल सामन्यात न्यूझीलंडने वेस्ट इंडिजवर ८ धावांनी विजय मिळवत फायनलमध्ये धडक मारली आहे. या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद १२८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संघ १२० धावांत गारद झाला. जिथे त्यांचा सामना दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाशी होणार आहे. त्यामुळे जगाला नवा विश्वविजेता मिळणार आहे.
दक्षिण आफ्रिकेने सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. न्यूझीलंडचा महिला संघ तिसऱ्यांदा महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार आहे. त्यांनी एकदाही ट्रॉफी जिंकलेली नाही. न्यूझीलंडला आता तिसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे. याआधी न्यूझीलंड संघ १४ वर्षांपूर्वी म्हणजे २०१० मध्ये शेवटचा अंतिम सामना खेळला होता. न्यूझीलंड महिला संघाने २०१६ च्या चॅम्पियन वेस्ट इंडिजचा उपांत्य फेरीच्या सामन्यात ८ धावांनी पराभव केला आहे. उभय संघांमधील सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगला होता, ज्यामध्ये अनेक रोमांचक ट्विस्ट आणि टर्निंग पॉइंट पाहिला मिळाले.
कसा झाला सामना?
या सामन्यात न्यूझीलंडच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या न्यूझीलंडची सुरुवात चांगली झाली नाही. किवी फलंदाज ठराविक अंतराने पॅव्हेलियनमध्ये परतत राहिले. न्यूझीलंडसाठी जॉर्जिया प्लंबरने ३१ चेंडूत सर्वाधिक ३३ धावा केल्या. तर अनुभवी फलंदाज सुझी बेट्सने २८ चेंडूत २६ धावांचे योगदान दिले. ब्रुक हॉलिडेने ९ चेंडूत १८ धावांची उपयुक्त खेळी खेळली. तर इसाबेला गेजने १४ चेंडूत २० धावांचे योगदान दिले. वेस्ट इंडिजकडून डिआंड्रा डॉटिनने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. याशिवाय एफी फ्लेचरने २ विकेट्स घेतल्या. करिश्मा आणि ॲलेने प्रत्येकी एकाला फलंदाजाला बाद केले.
हेही वाचा – Sai Sudharsan : साई सुदर्शनने टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी ठोकला दावा, दिल्लीविरुद्ध झळकावले वादळी द्विशतक
न्यूझीलंडच्या १२८ धावांच्या प्रत्युत्तरात फलंदाजीला आलेल्या वेस्ट इंडिजची सुरुवात खराब झाली. कॅरेबियन फलंदाज पॅव्हेलियनच्या जवळ जात राहिले. वेस्ट इंडिजकडून डिआंड्रा डॉटिनने २२ चेंडूत ३३ धावांची सर्वोच्च खेळी खेळली. एफी फ्लेचरने १५ चेंडूत १७ धावा केल्या. तर हेली मॅथ्यूजने २१ चेंडूत १५ धावांची खेळी केली. न्यूझीलंडकडून एडन कारसनने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. अमेलिया केरने २ विकेट्स घेतल्या. याशिवाय फ्रान जोनास, लेह ताहुहू आणि सुझी बेट्स यांनी प्रत्येकी एक विकेट्स घेतली.
२० ऑक्टोबरला जगाला मिळणार नवा विश्वविजेता –
महिला टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना न्यूझीलंड महिला संघ आणि दक्षिण आफ्रिका महिला संघ यांच्यात होणार आहे. उभय संघांमध्ये होणारा हा सामना २० ऑक्टोबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. दोन्ही संघांनी कधीही टी-२० विश्वचषकाचे विजेतेपद पटकावलेले नाही. अशा स्थितीत आता २० ऑक्टोबरला जगाला नवा विश्वविजेता मिळणार आहे.