WI vs SA 2nd Test 1st Day Highlights: वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना सुरू झाला आहे. हा सामना गयानाच्या प्रोव्हिडन्स स्टेडियमवर खेळवला जात आहे. या मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला होता. आता दुसऱ्या सामन्याच्या पहिल्याच दिवशी १७ विकेट पडल्या आहेत. वेगवान गोलंदाजांपुढे दोन्ही संघांच्या फलंदाजांनी पार गुडघे टेकले. पहिल्या डावात दक्षिण आफ्रिका १६० धावांवर बाद झाल्यानंतर वेस्ट इंडिजची धावसंख्या ९७ धावांत ७ विकेट्स अशी आहे.
वेगवान गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला सुरुवातीपासूनच अडचणीत आणले. सलामीवीर टोनी डीजॉर्ज फक्त एक धाव काढून जेडेन सील्सच्या गोलंदाजीवर बाद झाला. यानंतर शामर जोसेफने माक्ररम आणि कर्णधार बावुमाला तीन चेंडूंत बाद केले. यानंतरही एकाही फलंदाजाला सातत्यपूर्ण खेळ करता आला नाही. दक्षिण आफ्रिकेने ९७ धावांवर ९ विकेट गमावल्या. यानंतर डॅन पीट आणि नांद्रे बर्जर यांनी अखेरच्या विकेटसाठी ६३ धावांची भागीदारी केली. यासह दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या १६० वर पोहोचली. पीएटने संघासाठी ३८ धावांची सर्वात मोठी खेळी खेळली. वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर चेंडूने आश्चर्यकारक कामगिरी करणाऱ्या शमार जोसेफने ५ फलंदाजांना बाद केले. सील्सलाही ३ विकेट मिळाले.
फलंदाजीसाठी अवघड असलेल्या खेळपट्टीवर पलटवार करण्यात दक्षिण आफ्रिकेला वेळ लागला नाही. दुसऱ्याच षटकात बर्जरने मायकेल लुईसला बाद केले. कर्णधार ब्रॅथवेट (३) ही जास्त वेळ क्रीजवर टिकू शकला नाही. वेस्ट इंडिजला पाचवा धक्का केसी कार्टीच्या रूपाने ४७ धावांवर बसला. मात्र, यानंतर जेसन होल्डरने एका टोकावर पाय रोवून उभा राहिला. त्याने गुडाकेश मोतीसोबत ७व्या विकेटसाठी ४१ धावा जोडल्या. दिवसाच्या शेवटच्या चेंडूवर मोती केशव महाराजकडून पायचीत झाला. होल्डर सध्या ३३ धावांवर नाबाद आहे. विआन मुल्डरने ४ तर बर्गरने २ विकेट घेतले.
पहिल्या दिवसाच्या खेळात दक्षिण आफ्रिकेच्या विआन मुल्डरने उत्कृष्ट गोलंदाजी केली. वियानने पहिल्या दिवसाच्या खेळात फक्त ६ षटके टाकली आणि १८ धावा देत ४ विकेट घेतले. वेस्ट इंडिज संघाचा कर्णधार क्रेग ब्रॅथवेटला बाद करण्याबरोबरच वियानने अलिक अथानाजे, केव्हम हॉज आणि जोशुआ डी सिल्वा यांनाही बाद केले.
वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील गयाना कसोटीच्या पहिल्या दिवशी गोलंदाजांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचा अंदाज यावरून लावता येतो की, दोन्ही संघांच्या डावांसह एकूण १० खेळाडू असे होते की ज्यांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. यापैकी ५ खेळाडू असे आहेत जे शून्यावर बाद होत पॅव्हेलियनमध्ये परतले.
© IE Online Media Services (P) Ltd