झिम्बाब्वेविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात वेस्ट इंडिजचा सलामीवीर तेजनारायन चंद्रपॉलने शतक झळकावले. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक पूर्ण केले. त्याचबरोबर या बाप-लेकांनी वेस्ट-इंडिजसाठी एक खास विक्रम केला. तेजनारायनने यादरम्यान सहकारी फलंदाज क्रेग ब्रॅथवेटसोबत पहिल्या विकेटसाठी २२१ धावांची नाबाद शतकी भागीदारीही केली.
कारकिर्दीतील पहिले शतक झळकावल्यानंतर तेजनारायण आणि शिवनारायण, या जोडीने पिता-पुत्र जोडीच्या खास यादीत आपले स्थान निर्माण केले आहे. वेस्ट इंडिजसाठी, कसोटी क्रिकेटमध्ये शतके झळकावणारी ही पहिली पिता-पुत्र जोडी ठरली आहे. त्याचबरोबर असा पराक्रम करणारी ही जगातील १२वी जोडी ठरली आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावणारी पिता-पुत्र जोडी –
१. लाला-मोहिंदर अमरनाथ (भारत)
२. ख्रिस-स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड)
३. हनीफ-शोएब मोहम्मद (पाकिस्तान)
४. वॉल्टर-रिचर्ड हॅडली (न्यूझीलंड)
५. इफ्तिखार-मंसूर अली खान पतौडी (इंग्लंड, भारत)
६. ज्योफ-शॉन मार्श (ऑस्ट्रेलिया)
७. नसर-मुदस्सर (पाकिस्तान)
८. केन-हमिश रुदरफोर्ड (न्यूझीलंड)
९. विजय-संजय मांजरेकर (भारत)
१०. डेव्ह-डडली नर्स (दक्षिण आफ्रिका)
११. रॉड-टॉम लाथन (न्यूझीलंड)
१२. तेजनारायण-शिवनारायण चंद्रपॉल (वेस्ट इंडिज)
बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लब येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशीही पावसाने त्रास दिला. पावसाच्या व्यत्ययामुळे पहिल्या डावातील आतापर्यंत केवळ ८९ षटके पूर्ण झाली आहेत.
ज्यामध्ये वेस्ट इंडिजने आत्तापर्यंत २२१ धावा विकेट न गमावता केल्या आहेत. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत तेजनारायन आणि क्रेग ब्रॅथवेट यांनी विंडीजसाठी शतके झळकावली. तेजनारायण १०१ आणि ब्रेथवेट ११६ धावांवर नाबाद आहेत.
वेस्ट इंडिज प्लेइंग इलेव्हन –
क्रेग ब्रॅथवेट (कर्णधार), तेजनारायन चंद्रपॉल, रेमन रेफर, जर्मेन ब्लॅकवुड, काइल मेयर्स, रोस्टन चेस, जोशुआ दा सिल्वा (विकेटकीपर), जेसन होल्डर, अल्झारी जोसेफ, गुडाकेश मोती, केमार रोच