बेन वॉटसन याने दुखापतीच्या वेळेत केलेल्या निर्णायक गोलच्या जोरावर विगान अ‍ॅथलेटिकने अंतिम फेरीत मँचेस्टर सिटीसारख्या बलाढय़ संघाचा १-० असा पराभव करून एफए चषक जेतेपदाला गवसणी घातली.
शॉन मेलोनीने कॉर्नरवरून दिलेल्या पासवर गोलजाळ्याच्या जवळ असलेल्या वॉटसनने हेडरद्वारे चेंडूला गोलजाळ्याची दिशा दाखवली आणि २०११च्या विजेत्या मँचेस्टर सिटीला पराभवाचा धक्का दिला. वॉटसनच्या या गोलमुळे विगान अ‍ॅथलेटिकने ८१ वर्षांच्या इतिहासात पहिल्या प्रतिष्ठेच्या जेतेपदावर नाव कोरले. इंग्लिश प्रीमिअर लीगमधून पुढील मोसमासाठी बाहेर पडण्याची नामुष्की विगानवर ओढवली असली तरी प्रशिक्षक रॉबेटरे मार्टिनेझ यांच्यासह खेळाडूंनी जेतेपदाचा जल्लोष साजरा केला.
‘‘वेम्बले स्टेडियमवर जेतेपद पटकावणे, हे अविस्मरणीय आहे. या स्पर्धेत कुणीही विगानला जेतेपदासाठी ग्राह्य़ धरले नव्हते. पण खेळाडूंनी कडवी झुंज दिली आणि जेतेपद मिळवले,’’ असे मार्टिनेझ यांनी सांगितले. आम्ही या सामन्यात सुमार खेळ केला, हे मँचेस्टर सिटीचा कर्णधार विन्सेन्ट कोम्पानी याने मान्य केले. तो म्हणाला, ‘‘विजयाचे श्रेय विगानलाच जाते. जेतेपदाबद्दल त्यांना शुभेच्छा. जेतेपद मिळवण्याचे अनेक क्षण सिटीकडे असतील.’’

Story img Loader