भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी मिळाल्यास ती सांभाळण्यास सक्षम असल्याची प्रतिक्रिया आशिय चषक विजेता कर्णधार रोहित शर्माने दिली आहे. नियमित कर्णधार विराट कोहलीला अति क्रिकेटमुळे आशिया चषकात आराम दिला होता. त्याच्या अनुपस्थितीत संघाची धुरा रोहित शर्माकडे सोपवण्यात आली होती. रोहित शर्माने आपल्यावक दाखवलेला विश्वासास आशिया चषकात यशस्वी कर्णधारपद सांभाळून पात्र ठरला आहे. आशिया चषकाच्या विजयानंतर पत्रकारांनी रोहितला भविष्यात संघाचं पूर्णवेळ नेतृत्व करणार का? असं विचारलं असता, त्यानं नि:संकोचपणे तयारी दाखवली. ‘नक्कीच! जेव्हा-केव्हा तशी संधी मिळेल तेव्हा मी आनंदानं कर्णधारपद स्वीकारेन,’ असं तो म्हणाला.
पुढे तो म्हणाला की, ‘संघातील प्रत्येक युवा खेळांनी तुला सर्व सामने खेळाचे आहेत असे सांगत असतो. संघातील प्रत्येक खेळाडूला विश्वासात घेऊन संघाची रणनिती आखत असतो. यातूनच नवे खेळाडू घडतात. एखाद्या अपयशी सामन्यानंतर किंवा अन्य काही कारणामुळे एखाद्या खेळाडूला आपल्याला वगळलं जाईल असं वाटलं तर साहजिकच त्याला नैसर्गिक खेळ करणं कठीण जातं. प्रत्येक खेळाडूला पुरेशी संधी देण्याचा माझा प्रयत्न असतो. त्यातूनच खेळाडूंच्या क्षमता लक्षात येतात. केवळ एखाद्या सामन्यातून कुणाबद्दलही अंदाज बांधता येत नाही.’
रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने आतापर्यंत दोन मालिका जिंकल्या आहेत. श्रीलंका येथे झालेल्या निदहास चषकावर भारताने नाव कोरले होते आणि आता आशिया चषक जिंकला आहे. रोहित शर्माच्या या कामगिरीमुळे चाहत्यांच्या आणि क्रिडाप्रेमींच्या आपेक्षा वाढल्या आहेत. दुबईत झालेल्या आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भारताने बांगलादेशवर मात करत आशिया चषकाचं विजेतेपद पटकावलं आहे. बांगलादेशने दिलेलं २२३ धावांचं आव्हान भारताने अटीतटीच्या लढतीत शेवटच्या चेंडूवर पूर्ण केलं. ३ गडी राखून बांगलादेशवर मात करत भारत सातव्यांदा आशिया चषकाचा मानकरी ठरला आहे. महेंद्रसिंह धोनी माघारी परतल्यानंतर संकटात सापडलेल्या भारतीय संघाला जाडेजा-भुवनेश्वरने भागीदारी रचून विजयाच्या वाटेवरण आणलं. ही जोडी माघारी परतल्यानंतर केदार जाधव-कुलदीप यादव जोडीने अखेरच्या षटकांमध्ये भारताला विजय मिळवून दिला.
सामना संपल्यानंतर झालेल्या सत्कार सोहळ्यात कर्णधार रोहित शर्माने या विजयाचं श्रेय संपूर्ण भारतीय संघाला दिलं. “संपूर्ण मालिकेत आम्ही सर्वोत्तम खेळ केला आहे, त्यामुळे हे विजेतेपद आम्ही केलेल्या मेहनतीला मिळालेलं फळ आहे. याआधीही अशा अटीतटीच्या सामन्यांचा अनुभव मी घेतला आहे, मात्र ज्या पद्धतीने अखेरच्या षटकात फलंदाजांनी दबावाचा सामना करत संघाला विजय मिळवून दिला ही गोष्ट वाखणण्याजोगी आहे. अखेरच्या १० षटकांमध्ये आमच्यावर दबाव टाकण्यात बांगलादेशचा संघही यशस्वी झाला, त्यामुळे ते देखील कौतुकास पात्र आहेत”, अशा शब्दांत रोहितने आपल्या संघाचं कौतुक केलं.