मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपला शेवटचा कसोटी सामना मुंबईतील वानखेडे मैदानावर खेळणार आहे. मात्र त्याआधी तो खेळणार असलेली कोलकाता कसोटी संस्मरणीय करण्यासाठी बंगाल क्रिकेट असोसिएशनने जंगी कार्यक्रम आखला आहे. कोलकाता कसोटी सचिनची १९९वी कसोटी आहे. या कसोटीच्या दुसऱ्या डावात सचिन फलंदाजी करत असताना त्याच्यावर गुलाबपुष्पवृष्टी करण्याची अनोखी संकल्पना कॅब अर्थात बंगाल क्रिकेट असोसिएशन राबवणार आहे. १९९ ग्रॅम गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षांव सचिनवर करण्यात येणार आहे.
या कसोटीदरम्यान बंगाल सरकारतर्फे सचिनचा खास सत्कार केला जाणार आहे. कसोटी संपल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनजी सचिनला गौरवणार आहेत, अशी माहिती कॅबचे संयुक्त सचिव सुबीर गांगुली यांनी दिली.
जागतिक क्रिकेटला असलेल्या अतुलनीय योगदानाची आठवण म्हणून ३ नोव्हेंबरपासून सचिनची प्रतिकृती असलेला चित्ररूपी रथ कोलकात्यात फिरणार आहे. कोलकाता कसोटीनंतर कॅबतर्फे सचिन तेंडुलकरला एका विशेष मेजवानीचे आयोजन करण्यात येणार आहे. या मेजवानीप्रसंगी वेस्ट इंडिजचे महान फलंदाज व्हिव रिचर्ड्स आणि ऑस्ट्रेलियाचा विख्यात फिरकीपटू शेन वॉर्न उपस्थित असणार आहेत.
सचिनच्या १९९व्या कसोटीसाठी हजर राहणाऱ्या प्रेक्षकांनाही ही आठवण चिरंतन काळ स्मरणात राहावी यासाठी कॅबने एक विशेष संकल्पना आखली आहे. सचिनच्या कारकिर्दीची सचित्र माहिती देणारी ४५ पानी छोटेखानी पुस्तिका सर्व तिकीटधारकांना देण्यात येणार आहे.
कसोटी सुरू झाल्यानंतर कॅबतर्फे सचिनचा चेहरा असलेले मुखवटे आणि कटआऊट्स (भव्य फोटो) यांचे वाटप करण्यात येणार आहे. सचिन दुसऱ्या डावात फलंदाजी करत असताना एका विशेष विमानाद्वारे त्याच्यावर गुलाबाच्या पाकळ्यांची वृष्टी करण्यात येणार आहे.
सचिनच्या या ऐतिहासिक कसोटीसाठी ईडन गार्डन्स आतापासूनच सज्ज झाले असून, सचिनच्या भव्य कटआऊट्सनी ईडन गार्डन्स स्टेडियमचा परिसर सजला आहे. कारकिर्दीतील सचिनच्या विविध भावछटांचा वेध घेणारे सुमारे शंभर कटआऊट्स स्टेडियमच्या परिसरात लावण्यात येणार आहेत.
बंगाल क्रिकेट असोसिएशनचा सचिन गौरव कार्यक्रम जाहीर
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपला शेवटचा कसोटी सामना मुंबईतील वानखेडे मैदानावर खेळणार आहे. मात्र त्याआधी तो खेळणार असलेली
First published on: 30-10-2013 at 05:36 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will give sachin a royal adieu try to bring his family cab