चौथा कसोटी सामना आजपासून; ऑस्ट्रेलियात प्रथमच मालिका जिंकण्याची संधी
भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका
भारताने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर आतापर्यंत एकदाही कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम दाखवलेला नाही. सिडनीत इतिहास घडवून तिरंगा फडकवण्याची नामी संधी भारतापुढे आहे. मात्र लढतीच्या पूर्वसंध्येला दोन महत्त्वाचे धक्के भारताला बसले आहेत. परंतु तरीही चौथ्या कसोटीत विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारताचे पारडे जड मानले जात आहे.
चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाकडे सध्या २-१ अशी दिलासा देणारी आघाडी आहे. चौथ्या कसोटीला सामोरे जाण्यापूर्वी हुकमी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन आणि अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्माच्या दुखापतींनी भारताला हादरवले आहे. मात्र भारतीय संघ सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर ३-१ असे वर्चस्व निर्माण करील अशी चिन्हे आहेत.
भारतीय संघाने सिडनी कसोटी अनिर्णीत राखली तरी मालिकेवर त्यांचे प्रभुत्व असेल. गावस्कर-बॉर्डर चषकावर भारताने आधीच दावा केला आहे. १९४७-४८पासून भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जात आहे. यापैकी १९८०-८१, १९८५-८६ आणि २००३-०४ अशा तीन वेळा भारताला कसोटी मालिका बरोबरीत सोडवता आली आहे, तर १९६७-६८, १९७७-७८, १९९१-९२, १९९९-२०००, २००७-०८, २०११-१२ आणि २०१४-१५ अशा सात कसोटी मालिका गमावल्या आहेत. मालिकेतील आघाडीसह अखेरच्या कसोटीकडे वाटचाल करणारा विराट हा एकमेव कर्णधार आहे.
चेंडू फेरफार प्रकरणामुळे स्टीव्हन स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरून बँक्रॉफ्ट यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या संघाची फलंदाजी त्यांच्या नेहमीच्या दर्जाची होत नाही. परंतु तरीही ऑस्ट्रेलियातील कसोटी विजय भारतीय संघासाठी खास असेल.
भारतापुढील आव्हाने
विराटसह भारतीय संघव्यवस्थापनाला भारतीय संघबांधणी करताना आव्हानात्मक ठरणाऱ्या समस्यांवर उपाययोजनांचे पर्यायसुद्धा उपलब्ध आहेत.
समस्या : सिडनीत फिरकीलाही योग्य साथ मिळते, अशी परंपरा आहे. मात्र आर. अश्विन अद्याप दुखपतीतून सावरलेला नाही. अॅडलेडच्या पहिल्या कसोटीत त्याच्या पोटाला दुखापत झाली होती. त्यामुळे पर्थ आणि मेलबर्न कसोटीला तो मुकला होता.
उपाय : अश्विनबाबतचा अंतिम निर्णय नाणेफेकीआधी घेण्यात येईल, असे विराटने स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्याचा अंतिम १३ खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला आहे. डावखुरा मनगटी फिरकी गोलंदाज कुलदीप यादवचा पर्याय उपलब्ध आहे.
समस्या : मधल्या फळीतील फलंदाज रोहित शर्मा कन्यारत्न झाल्यामुळे मायदेशी परतला आहे.
उपाय : रोहितच्या अनुपस्थितीत धावांसाठी झगडणारा सलामीवीर लोकेश राहुलला पुनरागमनाची संधी मिळेल. त्यामुळे पर्थला सलामी देणारा हनुमा विहारी सहाव्या स्थानावर फलंदाजीला उतरेल.
समस्या : इशांत शर्माच्या डाव्या बरगडय़ांना दुखापत झाली आहे.
उपाय : संघ व्यवस्थान या निर्णायक सामन्यात इशांतला खेळवण्याची जोखीम पत्करणार नाही. मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमरा यांच्या साथीला वेगवान माऱ्यात इशांतच्या जागी उमेश यादवचा समावेश करण्यात आला आहे.
भारत (अंतिम १३) : विराट कोहली (कर्णधार), मयांक अगरवाल, हनुमा विहारी, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, उमेश यादव, कुलदीप यादव, रविचंद्रन अश्विन.
ऑस्ट्रेलिया : टिम पेन (कर्णधार व यष्टीरक्षक), मार्क्स हॅरिस, आरोन फिंच, उस्मान ख्वाजा, ट्रॅव्हिस हेड, शॉन मार्श, मिचेल मार्श, नॅथन लायन, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, जोश हॅझलवूड, मार्नस लॅबश्ॉग्ने, पीटर हँड्सकोम्ब, पीटर सिडल.
सामन्याची वेळ : पहाटे ५ वाजल्यापासून.
थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स, सोनी टेन ३.