सध्या जगभराप्रमाणेच भारतामध्येही फिफा विश्वचषकाचा फिव्हर तयार झालेला आहे. भारतीय फुटबॉल संघ विश्वचषकासाठी कधी पात्र ठरणार हा वादाचा मुद्दा असला तरीही सध्या भारतीय चाहते #meridusricountry या हॅशटॅगच्या नावाखाली आपापल्या आवडत्या संघाला पाठींबा देत आहेत. फिफा विश्वचषकात रशियाने स्पेनवर पेनल्टी शूटआऊटमध्ये मात केली, याचवेळी नेदरलँडमध्ये सुरु असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत भारतीय संघाने रौप्यपदकाची कमाई केली. चॅम्पियन्स ट्रॉफीचं हे शेवटचं वर्ष असल्यामुळे या स्पर्धेचं विजेतेपद पटकावण्याचा भारतीय खेळाडूंनी पुरेपूर प्रयत्न केला. मात्र ऑस्ट्रेलियासमोर त्यांची डाळ काहीकेल्या शिजू शकली नाही. फिफाच्या धामधुमीत अनेकांचं भारतीय हॉकी संघाच्या या कामगिरीकडे लक्ष गेलं नसेल, मात्र गेल्या काही दिवसांमधली भारतीय संघाची कामगिरी पाहता या रौप्यपदकाने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. आगामी आशियाई खेळ, विश्वचषकाआधी हॉकी इंडियाने या प्रश्नांकडे लक्ष दिलं नाही, तर आगामी काळ भारतीय हॉकीसाठी खडतर ठरु शकतो.
मध्यंतरी प्रशिक्षक बदलांच्या सपाट्यामुळे हॉकी इंडिया चांगलच चर्चेत आलं होतं. सर्वात आधी पॉल वॅन अस, त्यानंतर रोलंट अल्टमन्स, जोर्द मरीन आणि आता हरेंद्र सिंह…गेल्या १८ वर्षांमध्ये हॉकी इंडियाने भारतीय संघासाठी तब्बल २२ प्रशिक्षक बदलले आहेत. मात्र भारतीय संघाच्या कामगिरीत हवातसा फरक झालेला दिसत नाही. अझलन शहा हॉकी स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीनंतर हरेंद्र सिंहांकडे भारतीय संघाची जबाबदारी सोपवण्यात आली. प्रशिक्षकपदाची सुत्र हातात आल्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी ही हरेंद्रसिंहासाठी सर्वात मोठी परीक्षा होती. मात्र दुर्दैवाने भारतीय हॉकीच्या भळभळत्या जखमेवर मलमपट्टी करण्यात हरेंद्रसिंह आणि ख्रिस सिरीलो ही जोडी अपयशी ठरली आहे.
हॉकीत पेनल्टी कॉर्नर हे गोल करण्यासाठी दुधारी शस्त्र मानलं जातं. प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूच्या पायाला बॉल लागल्यानंतर, २५ यार्ड रेषेच्या आत एखाद्या खेळाडूला अवैध पद्धतीने टॅकल केल्यानंतर, फटका खेळताना चेंडू हवेत धोकादायक पद्धतीने उडाल्यास रेफ्री प्रतिस्पर्धी संघाला पेनल्टी कॉर्नर बहाल करतो. यानंतर गोलपोस्टच्या शेजारी असलेल्या एका छोट्या रेषेवरुन खेळाडू बॉल इंजेक्ट करतो, इंजेक्ट केलेला हा बॉल २५ यार्ड रेषेच्या बाहेर ट्रॅप केला जातो आणि त्यानंतर ड्रॅगफ्लिकर गोल करण्याचा प्रयत्न करतो. हा सर्व प्रकार रेफ्रीने शिट्टी वाजवल्यानंतर अवघ्या काही सेकंदांमध्ये करायचा असतो, त्यामुळे इथे तुम्ही ढिले पडलात तर तुमची संधी वाया जाते. दुर्दैवाने गेली कित्येक वर्ष भारतीय हॉकीला आपल्या या दुखऱ्या जागेसाठी कोणतही औषध सापडलेलं नाहीये.
पेनल्टी कॉर्नवर गोल करण्यामध्ये भारताचा कन्वर्जन रेट हा अवघा ५ टक्के आहे. म्हणजेच उदाहरण द्यायचं झाल्यास एका सामन्यात भारताला १० पेनल्टी कॉर्नर मिळाले तर त्यापैकी केवळ २ पेनल्टी कॉर्नरवर भारत गोल करतो, म्हणजेच एका सामन्यात भारत ९५ % संधी वाया घालवतो. ध्यानचंद यांच्यासारख्या अनेक मातब्बर खेळाडूंचा वारसा लाभलेल्या भारतीय हॉकीला आपल्या या समस्येवर अजुनही उपाय सापडू नये ही खरच दुर्दैवाची बाब म्हणावी लागेल. रुपिंदपाल आणि हरमनप्रीत हे भारताचे पेनल्टी कॉर्नरसाठी दोन हक्काचे ड्रॅगफ्लिकर्स आहेत. मात्र हरमनप्रीतकडे रुपिंदरपालएवढा अनुभव नसल्यामुळे एखाद्या सामन्यात रुपिंदपाल दुखापतीमुळे गैरहजर असेल तर भारताचा संघ पूर्णपणे उघडा पडतो.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातही भारताला हीच चूक पुन्हा एकदा नडली. पहिल्या दोन सत्रांमध्ये भारताने हरमनप्रीत ऐवजी अमित रोहिदासला ड्रॅगफ्लिकींगची संधी दिली, आणि प्रत्यक्षात फटका खेळताना व्हेरिएशन्स करण्याच्या नादात तिन्ही संधी वाया घालवल्या. पेनल्टी कॉर्नरवर बॉल ड्रॅगफ्लिक करताना तुमच्या फटक्यांमध्ये ताकद असणं गरजेचं आहे. समोरुन येणारा बचावपटूला चकवत, गोलकिपरचा बचाव भेदून बॉल गोलपोस्टमध्ये टाकणं हे जोखमीचं काम होतं. काल ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात टायलर लोवेल या गोलकिपरचा बचाव भेदणं भारताच्या एकाही ड्रॅगफ्लिकरला जमलं नाही. अझलन शहा स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीनंतर हॉकी इंडियाने ख्रिस सिरीलोने या माजी ऑस्ट्रेलियन खेळाडूला भारतीय संघाचा सहाय्यक प्रशिक्षक म्हणून नेमलं. मात्र भारतीय खेळाडूंना पेनल्टी कॉर्नरचं प्रशिक्षण देण्याआधी सकारात्मक विचार करणं शिकवावं लागेल असं वक्तव्य करुन सिरीलोने भारतीय हॉकीच्या त्रुटींकडे बोट दाखवलं आहे.
हरेंद्रसिंह प्रशिक्षकपदावर आल्यानंतर सर्वच बाबी निराशाजनक आहेत अशातला काही भाग नाही. काही गोष्टींमध्ये भारतीय संघाने वाखणण्याजोगी प्रगती केली आहे, आणि त्याला दाद देणं गरजेचं आहे. पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्यात येत असलेलं अपयश पाहता, भारतीय हॉ़की खेळाडूंनी मैदानी गोल करण्याकडे आपलं लक्ष केंद्रीत केलं आहे. नेदरलँडमध्ये पार पडलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीत भारतीय खेळाडूंनी सुरेख मैदानी गोल करत चाहत्यांना दिलासा दिला. आघाडीच्या फळीतील रमणदीप सिंह, मनदीप सिंह, विवेक प्रसाद सागर या खेळाडूंनी यंदाच्या स्पर्धेत आपली दखल घ्यायला भाग पाडली आहे. विशेषकरुन आघाडीच्या फळीत असणारा समन्वय हा हरेंद्रसिंह आल्यापासून काहीसा सुधारल्याचं पहायला मिळालं आहे. प्रतिस्पर्धी संघाच्या पेनल्टी एरियात रमणदीप आणि सुनील हे खेळाडू उत्कृष्ठ दर्जाच्या चाली रचतायत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम सामन्यात विवेक सागर प्रसादने शॉर्ट पासच्या छोटेखानी पासवर सुंदर फिनीशींग टच देत भारताला बरोबरी मिळवून दिली होती.
सुरेंद्र कुमार, सरदार सिंह, अमित रोहिदास, बिरेंद्र लाक्रा, कर्णधार पी. आर. श्रीजेश यांनी चॅम्पियन्स ट्रॉफीत भक्कम बचाव केला. श्रीजेशने संपूर्ण स्पर्धेदरम्यान भारतीय गोलपोस्टचा यशस्वीरित्या बचाव केला आहे. या कामगिरीसाठी त्याला स्पर्धेत सर्वोत्कृष्ठ गोलकिपरचा पुरस्कारही मिळाला. आगामी आशियाई खेळ भारतीय हॉकी संघासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. या स्पर्धेचं विजेतेपट पटकावणाऱ्या संघाला ऑलिम्पिकमध्ये थेट प्रवेश मिळतो. यानंतर नोव्हेंबर महिन्यात भारतात हॉकी विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे या दोन महत्वाच्या स्पर्धांआधी भारतीय संघ आपल्या या कमकुवत बाजूवर काही उपाय काढतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अन्यथा मोक्याच्या क्षणी कच खाण्याची भारतीय हॉकीची परंपरा यंदाही कायम राहील यात काही वादच नाही.
- आपल्या प्रतिक्रीया prathmesh.dixit@indianexpress.com या इमेल आयडीवर कळवा