Will K L Rahul Take Retirement From Test Cricket? न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर लाजिरवाणा पराभव स्वीकारल्यानंतर आता भारतीय संघाची कामगिरी, भारतीय फलंदाजांची हाराकिरी आणि पराभवाची कारणमीमांसा या गोष्टी सुरू झाल्या आहेत. भारताचा असा पराभव क्रिकेट चाहत्यांसाठी धक्कादायक ठरला. पहिल्या डावात टीम इंडियाच्या सर्वच फलंदाजांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजीसमोर सपशेल शरणागती पत्करली. पण यात सर्वाधिक चर्चा होतेय ती मधल्या फळीतला फलंदाज-यष्टीरक्षक के. एल. राहुल याची! त्यात पराभवानंतर राहुलनं केलेल्या एका कृतीमुळे त्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

एकीकडे पहिल्या कसोटीत घरच्या मैदानावर साजेशी कामगिरी करता न आल्यामुळे के. एल. राहुल तणावात असताना दुसरीकडे त्याचं कसोटी संघातलं स्थानही डळमळीत होऊ लागलं आहे. गेल्या काही काळापासून दुखापतीमुळे संघाबाहेर असणारा शुबमन गिल पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. येत्या २४ ऑक्टोबरपासून पुण्यात भारत व न्यूझीलंड यांच्यात दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होत आहे. या सामन्यात के. एल. राहुल की शुबमन गिल असा प्रश्न संघ व्यवस्थापनासमोर उभा राहण्याची शक्यता आहे.

पहिल्या कसोटी सामन्यात के. एल. राहुलची कामगिरी निराशाजनक ठऱली. पहिल्या डावात भोपळाही फोडण्यात अपयशी ठरलेल्या राहुलला दुसऱ्या डावात इतर फलंदाजांनी धावा केल्या असताना फक्त १२ धावाच करता आल्या. वास्तविक त्याच्यानंतर आलेल्या रवींद्र जडेजालाही पाचच धावा करता आल्या. पण तरीदेखील चर्चा होतेय ती के. एल. राहुलच्या कामगिरीची. त्याची कसोटी कारकिर्दीतली सरासरी हा चिंतेचा विषय ठरतो आहे. राहुलनं आत्तापर्यंत ५३ कसोटी सामन्यांमध्ये ३३.८८ च्या सरासरीने अवघ्या २८९१ धावा केल्या आहेत. त्यामुळे राहुलला संघातून वगळलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रोहित शर्माने ‘सर्फराझची’ आठवण करून देत ट्रोल होणाऱ्या केएल राहुलला दिला अल्टिमेटम (फोटो-बीसीसीआय)

राहुलची ‘ती’ कृती आणि चाहते भावनिक!

दरम्यान, न्यूझीलंडविरुद्ध पराभव झाल्यानंतर एकीकडे टीम इंडिया निराश चेहऱ्यानं मैदानातून बाहेर पडत होती, तर दुसरीकडे के. एल. राहुलनं खेळपट्टीला हात लावून नमन केलं. त्याच्या या कृतीचा नेमका काय अर्थ होता, याबाबत अद्याप त्यानं स्वत: किंवा संघ व्यवस्थापनानं कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. पण कसोटीतली त्याची धावांची सरासरी, सध्याचा फॉर्म आणि मधल्या फळीसाठी शुबमन गिल व सर्फराज खानकडून उभं राहिलेलं तगडं आव्हान या पार्श्वभूमीवर राहुलचं संघातलं स्थान अस्थिर झालं आहे. त्यामुळे तो निवृत्ती स्वीकारणार का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

कर्णधार रोहित शर्माचा अप्रत्यक्ष इशारा?

दरम्यान, के. एल. राहुलच्या कामगिरीबाबत कर्णधार रोहित शर्माला विचारणा केली असता त्यानं केलेलं सूचक विधान राहुलसाठी अप्रत्यक्ष इशारा मानला जात आहे. “प्रत्येक सामन्यानंतर खेळाडूंच्या त्या सामन्यातील कामगिरीविषयी मी त्या-त्या खेळाडूशी मी बोलत नाही. प्रत्येकाला आपापली जबाबदारी माहिती माहिती आहे. त्यांना कल्पना आहे की ते त्यांच्या कारकिर्दीच्या कोणत्या टप्प्यावर उभे आहेत. एक सामना पाहून आम्ही कुठल्याही खेळाडूविषयीचं मत बदलत नाही किंवा बनवत नाही. सर्वांना माहिती आहे की संघामध्ये त्यांची जबाबदारी काय आहे”, असं रोहित शर्मा म्हणाला.

IND vs NZ: “त्यांना माहितीय ते कारकिर्दीच्या…”, रोहित शर्माकडून सर्फराझचा उल्लेख करत ट्रोल होणाऱ्या केएल राहुलला अल्टिमेटम

दरम्यान, राहुलचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्या चाहत्यांकडून त्याच्या समर्थनार्थ पोस्ट केल्या जात आहेत. त्यावरून राहुलच्या संघातील स्थानाविषयी चर्चा सुरू झाली आहे.