वल्र्ड सीरिज हॉकी स्पर्धेनंतर आता हॉकी इंडिया लीगचा घाट घातल्यानंतर मुंबईतील फ्रॅन्चायझी असलेल्या मुंबई मॅजिशियन्स संघाचा सराव सध्या मुंबई हॉकी असोसिएशनच्या महिंद्रा स्टेडियमवर सुरू आहे. जगातील अव्वल प्रशिक्षक रिक चाल्सवर्थ यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई मॅजिशियन्स संघ कसून सराव करत आहे. संदीप सिंगच्या नेतृत्वाखालील मुंबई संघाला ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानातील खेळाडूंची साथ लाभणार असून हॉकी इंडिया लीगमध्ये मुंबई संघाचे ‘मॅजिक’ चालेल की नाही, याचीच उत्सुकता साऱ्यांना आहे.
हॉकी संघटनांमधील वाद.. त्यातच भारतीय हॉकी संघाची खालावत चाललेली कामगिरी, या पाश्र्वभूमीवर हॉकी इंडिया लीगच्या रूपाने खेळाडूंना आपली कामगिरी सुधारण्याची आणि आंतरराष्ट्रीय हॉकीपटूंसह खेळण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे खेळाडूंची स्वारी भलतीच खूश आहे. मात्र स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली तरी आपल्याला काय करायचे आहे, हेच कुणाला माहीत नाही. मुंबई संघासाठी अद्याप प्रसिद्धी व्यवस्थापकाचाही पत्ता नाही. त्यातच पाकिस्तानच्या खेळाडूंना शुक्रवारी व्हिसा मिळाल्यामुळे ते लवकरच संघात सामील होतील. काही भारतीय खेळाडूही मुंबई संघात सामील व्हायचे आहेत. त्यातच स्पर्धेच्या पाच दिवसआधी संघाचे शिबिर सुरू झाल्यामुळे संघबांधणी करताना चाल्सवर्थ यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे.
पाकिस्तानी खेळाडूंना व्हिसा मिळाल्याबद्दल मुंबईचा कर्णधार संदीप सिंगने समाधान व्यक्त केले. तो म्हणाला, ‘‘पाकिस्तानचे खेळाडू आल्यावर आम्हाला संघबांधणी करणे सोपे जाणार आहे. संघात नऊ परदेशी खेळाडू असले तरी पाच जणांनाच एका सामन्यात खेळण्याची परवानगी आहे. त्यामुळे कुणाला संधी द्यायची, याची मोर्चेबांधणी आम्हाला करावी लागणार आहे. पाकिस्तानचे खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळून आल्यामुळे आणि अनुभवी असल्यामुळे त्यांना येथील परिस्थितीशी आणि सहकाऱ्यांशी जुळवून घेताना कोणत्याच अडचणी येणार नाहीत. मुंबई संघासाठी सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.’’