Asian Emerging Nations Cup स्पर्धेच्या यजमानपदासाठी बीसीसीआयने विरोध केल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेही आक्रमक पवित्रा घेतलेला पहायला मिळतोय. “आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीत आम्हाला स्पर्धेचं यजमानपद मिळालेलं आहे. त्यामुळे आमचा हक्क आम्ही सोडण्याचा प्रश्नच येत नाही.” पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजीम सेठी यांच्या भूमिकेमुळे येत्या काही दिवसांमध्ये हा प्रश्न चिघळण्याची शक्यता दिसत आहे. भारतासोबत बांगलादेश क्रिकेट बोर्डानेही सुरक्षेचं कारण देत पाकिस्तानात स्पर्धा खेळवण्यास नकार दिला आहे.
अवश्य वाचा – पाकिस्तानात क्रिकेट स्पर्धा नाही म्हणजे नाही – BCCI चा सर्जिकल स्ट्राइक
दुबईत झालेल्या आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीत बीसीसीआयने स्पर्धेचं ठिकाण बदललं जावं अशी भूमिका घेतली. बीसीसीआयच्या या भूमिकेला बांगलादेश क्रिकेट बोर्डानेही पाठींबा दिल्याचं समजतंय. मात्र काहीही झालं तरी आम्ही आमचा हक्क सोडणार नाही असं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्याने म्हणलं आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधले राजकीय संबंध आणि दहशतवादाच्या मुद्द्यावरुन गेल्या काही वर्षांमध्ये दोनही देशांमध्ये क्रिकेटचे सामने होत नाहीयेत.
८ वर्षांच्या खंडानंतर आयसीसीने पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळायला हिरवा कंदील दाखवला होता. यानंतर World XI संघाने पाकिस्तानचा दौराही केला. यानंतर श्रीलंकेचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर आला. याचदरम्यान पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजीम सेठी यांनी, पाकिस्तानला Asian Emerging Nations Cup स्पर्धेच्या यजमानपदाचे हक्क मिळाल्याचं जाहीर केलं होतं. मात्र २९ ऑक्टोबररोजी लाहोर येथे झालेल्या बैठकीत बीसीसीआय आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे पदाधिकारी हजर नसल्यामुळे त्यांनी या निर्णयाला विरोध दर्शवला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असलेला बीसीसीआयचा दबदबा आणि यजमानपदाचे हक्क सोडण्यास तयार नसलेला पाकिस्तान, या पेचातून आशियाई क्रिकेट परिषद नेमका काय मार्ग काढते हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.