शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या चुरशीच्या मुकाबल्यात ऑस्ट्रेलियाने निसटता विजय मिळवत U19 वर्ल्डकप स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. रविवारी त्यांच्यासमोर गतविजेत्या भारताचे आव्हान असेल. बेनोई इथे झालेल्या
सेमी फायनलच्या लढतीत १८० धावांचे आव्हान पेलताना ऑस्ट्रेलियाची दमछाक झाली आणि त्याने एका विकेटने विजय मिळवला.
स्पर्धेत भेदक गोलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानसमोर ऑस्ट्रेलियाची अवस्था बिकट झाली होती. पण रॅफ मॅकमिलनने नाबाद १९ धावा करत संघाला संस्मरणीय विजय मिळवून दिला. पाकिस्तानतर्फे अली रझाने ४ तर मिन्हासने २ विकेट्स घेतल्या.
हॅरी डिक्सन आणि सॅम कोन्तास यांनी ३३ धावांची चांगली सलामी दिली. पण यानंतर अली रझाने सॅमला १४ धावांवर बाद केलं. कर्णधार ह्यूज वेइब्गन केवळ ४ धावा करुन तंबूत परतला. पाठोपाठ हर्जीत सिंगही माघारी परतला. रायन हिक्सला तर भोपळाही फोडता आला नाही. सलामीला येऊन खेळपट्टीवर ठाण मांडलेल्या हॅरी डिक्सनने अर्धशतक पूर्ण केलं. पण त्याला धावांसाठी संघर्ष करावा लागला.
अर्धशतकानंतर लगेचच मिन्हासने त्याला बाद केलं. त्याने ७५ चेंडूत ५ चौकारांसह ५० धावांची खेळी केली. खेळपट्टीवर स्थिरावलेला हॅरी बाद होणं ऑस्ट्रेलियासाठी मोठा धक्का होता.
टॉम कॅम्पबेल आणि ऑलिव्हर पिईक यांनी सहाव्या विकेटसाठी ४४ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. सामन्याचं पारडं ऑस्ट्रेलियाच्या दिशेने झुकलंय असं वाटत असतानाच मिन्हासने कॅम्पबेलला बाद केलं.
ऑलिव्हरने रॅफ मॅकमिलनला हाताशी घेत किल्ला लढवला. ही जोडी स्थिरावतेय असं वाटत असतानाच अली रझाने ऑलिव्हरला बाद केलं. त्याने ४९ धावांची संयमी खेळी केली.
गोलंदाजी करताना ६ विकेट्स पटकावणाऱ्या टॉम स्ट्रेकरला अली रझाने स्वत:च्या शेवटच्या ओव्हरमध्ये बाद केलं. त्याच ओव्हरमध्ये माहली बिअर्डमनला बाद करत अली रझाने सामन्याचं पारडं पाकिस्तानच्या बाजूने झुकवलं. पण मॅकमिलनने संयमी खेळ करत कांगारुंना विजय मिळवून दिला.