पुणे वॉरियर्ससमोर चेन्नई सुपर किंग्सचे आव्हान
संघात एकापेक्षा एक गुणवान खेळाडू आहेत, मात्र सातत्याच्या अभावामुळे पुणे वॉरियर्स संघ गुणतालिकेत तळाशी फेकला गेला आहे. घरच्या मैदानावर आता त्यांच्यासमोर आव्हान आहे बलाढय़ चेन्नई सुपर किंग्सचे. सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या चेन्नईचा विजयरथ रोखण्याचे आव्हान पुणे वॉरियर्ससमोर असणार आहे.
विशेष म्हणजे स्पर्धेत सातत्याने सामने गमावणाऱ्या पुण्याने सुपर किंग्सला चेन्नईत नमवण्याची करामत यंदाच्या हंगामात केली आहे. या विजयाची पुनरावृत्ती करण्यासाठी वॉरियर्स उत्सुक आहेत. मात्र मंगळवारी जिंकण्यासाठी त्यांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल कारण चेन्नईचा संघ आता फॉर्मात आला आहे. अनुभवी माइक हसी सातत्याने धावा करत असल्याने चेन्नईची सलामी भक्कम आहे.
मुरली विजयच्या जागी संघात आलेल्या वृद्धिमान साहानेही चांगली सुरुवात केल्याने चेन्नईची सलामीची चिंता मिटली आहे. सुरेश रैनाला सातत्य राखता आलेले नाही. मात्र महेंद्र सिंग धोनी तुफानी फॉर्ममध्ये असल्याने वॉरियर्सला त्याला रोखणे महत्त्वाचे आहे. बद्रीनाथ, जडेजा, ब्राव्हो या तिघांकडून सातत्यपूर्ण खेळाची अपेक्षा आहे.
दुसरीकडे फलंदाजीच्या बाबतीत पुण्याचा संघ धडपडताना दिसत आहे. आरोन फिन्च आणि रॉबिन उथप्पा या जोडीकडून नियमितपणे दमदार सलामी मिळणे आवश्यक आहे. युवराज सिंगला मोठी खेळी करण्यात आलेले अपयश वॉरियर्सच्या चिंता वाढवणारे आहे. अभिषेक नायर, ल्युक राइट, स्टीव्हन स्मिथ यांच्यावर पुण्याच्या फलंदाजीची भिस्त आहे. ड्वेन ब्राव्हो, अल्बी मॉर्केल, ख्रिस मॉरिस या अष्टपैलू त्रिकुटामुळे चेन्नईचा संघ संतुलित आहे. गोलंदाजीत विशेषत: शेवटच्या षटकांमध्ये होणाऱ्या धावा रोखणे त्यांच्यासाठी काळजीचा विषय आहे. मोहित शर्मा हा युवा गोलंदाज चांगली कामगिरी करत आहे मात्र मुख्य गोलंदाज डर्क नॅन्सला अजूनही सूर गवसलेला नाही. अश्विनला विकेट्स आणि धावा रोखणे दोन्ही आघाडय़ांवर सातत्य आणायला हवे. पुण्याच्या गोलंदाजीची भिस्त भुवनेश्वर कुमारवर आहे. तो सातत्याने चांगले प्रदर्शन करत आहे. मात्र त्याला दुसऱ्या बाजूने साथ मिळणे आवश्यक आहे.
अशोक दिंडा विकेट्स मिळवण्यात यशस्वी ठरला आहे मात्र धावा रोखण्याचीही जबाबदारीही त्याने स्वीकारायला हवी. राहुल शर्माने कामगिरीत सातत्य राखल्यास पुण्याला विजय मिळू शकतो.
सामन्याची वेळ : रात्री ८ पासून

Story img Loader