India vs Australia 3rd T20: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा सामना मंगळवारी (२८ नोव्हेंबर) होणार आहे. दोन्ही संघ गुवाहाटी येथील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर दोन हात करणार आहेत. दोन सामने जिंकून टीम इंडिया मालिकेत २-०ने आघाडीवर आहे. तिसरा सामना जिंकून मालिकेत अजेय आघाडी घेण्यावर सूर्यकुमार यादव अँड कंपनीची नजर असेल. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली संघाने आतापर्यंत चमकदार कामगिरी केली असून त्यांची नजर कांगारूंना पुन्हा एकदा पराभूत करण्यावर आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Accuweather नुसार, २८ नोव्हेंबर रोजी गुवाहाटीमध्ये दिवसा ढगाळ हवामान राहण्याची अपेक्षा आहे. आकाश ढगांनी झाकले जाण्याची शक्यता आहे. संध्याकाळी रिमझिम पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.०० वाजता खेळ सुरू होईल. त्यावेळी कमाल तापमान २१ अंश सेल्सिअस राहण्याची अपेक्षा आहे आणि खेळ संपल्यानंतर भारतीय वेळेनुसार रात्री १०:३०च्या सुमारास तापमान १९ अंश सेल्सिअसपर्यंत घसरेल. अशा परिस्थितीत प्रेक्षकांना आणखी एक रोमांचक सामना पाहता येणार आहे.

फलंदाजांना खेळपट्टीची मदत मिळेल

गुवाहाटीची खेळपट्टी फलंदाजांना मदत करेल अशी अपेक्षा आहे. अशा स्थितीत या सामन्यातही धावांचा पाऊस पडू शकतो. या मैदानावर अनेक चौकार आणि षटकार मारले जातात. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील शेवटच्या टी-२० मध्ये येथे ४०० हून अधिक धावा झाल्या. चाहत्यांना आणखी एक रोमहर्षक सामना पाहायला मिळू शकतो.

हेही वाचा: IND vs AUS: सर्वाधिक टी-२० जिंकण्याच्या बाबतीत भारत पाकिस्तानचा अनोखा विक्रम मोडणार का? जाणून घ्या

गुवाहाटीमध्ये टीम इंडियाचा रेकॉर्ड काय आहे?

भारतीय संघाने या मैदानावर आतापर्यंत तीन टी-२० सामने खेळले आहेत. २०१७ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध येथे पराभवाला सामोरे जावे लागले होते. टीम इंडियाला सहा वर्षांनंतर बदला घ्यायला आवडेल. २०२२ मध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १६ धावांनी विजय मिळवला होता. २०२० मध्ये श्रीलंकेविरुद्ध एक सामना खेळवला जाणार होता, परंतु नाणेफेक झाल्यानंतर पावसामुळे हा सामना होऊ शकला नाही.

बारसापारा स्टेडियममधील टी-२० सामन्याची आकडेवारी

बारसापारा क्रिकेट स्टेडियम २०१२ मध्ये बांधण्यात आले होते, येथे ४० हजार प्रेक्षकांची आसन व्यवस्था आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात येथे पहिला आंतरराष्ट्रीय टी-२० सामना झाला. आत्तापर्यंत येथे ३ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने झाले आहेत, त्यापैकी एक अनिर्णित होता.

हेही वाचा: IPL 2024: आयपीएल २०२४च्या हंगामात कोण असेल मुंबई इंडियन्सचा कर्णधार, रोहित शर्मा की हार्दिक पंड्या?

दोन्ही संघ पुढीलप्रमाणे आहेत

भारत: यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, तिलक वर्मा, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, प्रसिध कृष्णा, आवेश खान, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे.

ऑस्ट्रेलिया: स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू शॉर्ट, जोश इंग्लिश, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक/कर्णधार), शॉन अ‍ॅबॉट, नॅथन एलिस, अ‍ॅडम झम्पा, तन्वीर संघा, केन रिचर्डसन, जेसन बेहरनडॉर्फ, ट्रॅव्हिस हेड, अ‍ॅरॉन हार्डी.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will rain interrupt in india vs australia todays match know weather and pitch in guwahati avw