Ashish Nehra on Rinku Singh: माजी भारतीय वेगवान गोलंदाज आशिष नेहराच्या मते, डावखुरा विस्फोटक फलंदाज रिंकू सिंग भारताच्या टी-२० विश्वचषक संघात ‘फिनिशर’ म्हणून आपली भूमिका निभावू शकतो. मात्र, या जागेसाठी त्याला सहकारी खेळाडूंकडून कडवे आव्हान पेलावे लागेल, असे मत नेहराने व्यक्त केले. पुढील वर्षी जूनमध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत टी-२० विश्वचषक खेळवला जाणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या सामन्यात रिंकूने २९ चेंडूत ४६ धावांची खेळी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेहरा म्हणाला, “भारताच्या टी-२० विश्वचषक संघात स्थान मिळवण्याच्या शर्यतीत रिंकू प्रमुख दावेदार खेळाडूंपैकी एक आहे, यात शंका नाही. पण विश्वचषक अजून खूप दूर आहे आणि तो ज्या स्थानावर खेळणार आहे, त्या जागी अनेक इतर मोठे खेळाडू आहेत. त्यासाठी त्याला हार्दिक पंड्यासह अनेक खेळाडूंना मागे टाकावे लागेल. तो अजून नवीन असून त्याची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय मालिका होती. रिंकूने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत काही चांगल्या खेळी खेळल्या, त्यात तिरुअनंतपुरममधील दुसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यातील ९ चेंडूत ३१ धावांच्या खेळीचा समावेश आहे. त्याच्या या आक्रमक फलंदाजीमुळे भारताने तो सामना ४४ धावांच्या फरकाने जिंकला.

रोहित शर्मा आणि विराट कोहली टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाचा भाग असतील की नाही याबद्दल कोणतीही स्पष्टता नाही, त्यामुळे संघात अनेक मोठे बदल होऊ शकतात. रिंकू सिंह हा ‘स्लॉग ओव्हर’चा प्रबळ दावेदार असू शकतो. माजी भारतीय वेगवान गोलंदाज नेहरा पुढे म्हणाला, “तुम्ही जितेश शर्मा (यष्टीरक्षक फलंदाज) आणि तिलक वर्मा यांनाही विश्वचषक २०२४मध्ये पाहू शकता. मात्र, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या कोणत्या पदांवर खेळणार याबाबतची चर्चा संघ व्यवस्थापनाला करावी लागणार आहे.”

हेही वाचा: Shubman Gill: २०२३ गिलसाठी ‘शुभ’वर्ष! ‘स्पोर्ट्स लीडर ऑफ द इयर’च्या पुरस्काराने केले सन्मानित

नेहरा पुढे म्हणाला, ‘१५ सदस्यीय संघात किती जागा उपलब्ध आहेत हे पाहावे लागेल. पण एक गोष्ट म्हणजे रिंकूने सगळ्यांवरच दडपण आणलंय. मात्र, विश्वचषकाला अजून बराच अवधी शिल्लक आहे. त्याआधी दक्षिण आफ्रिकेचा दौरा, अफगाणिस्तानविरुद्धची मालिका आणि आय.पी.एल आहे.”

पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील अखेरच्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा सहा धावांनी पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने मालिका ४-१ने जिंकली. त्यांनी विशाखापट्टणममध्ये दोन गडी राखून आणि तिरुवनंतपुरममध्ये ४४ धावांनी विजय मिळवला होता. यानंतर गुवाहाटीमध्ये ऑस्ट्रेलियाने मालिकेत टीम इंडियाला आव्हान देत पाच गडी राखून सामना जिंकला. मात्र, भारताने दमदार पुनरागमन करत शेवटचे दोन सामने जिंकले. रायपूरमध्ये त्यांनी ऑस्ट्रेलियाचा २० धावांनी आणि आता बंगळुरूमध्ये सहा धावांनी पराभव केला.

हेही वाचा: World Cup: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शानदार कामगिरीनंतरही अक्षर पटेल नाराज; म्हणाला, “विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर मी…”

टी-२० मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा १९व्यांदा पराभव केला आहे. भारताचा हा एकाच संघाविरुद्धचा संयुक्त सर्वोच्च विजय आहे. श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या दोन संघांमध्ये झालेल्या टी-२० मालिकेत १९-१९ असा विजय मिळवला आहे. एका संघाविरुद्ध सर्वाधिक विजय मिळवण्याचा विक्रम पाकिस्तानच्या नावावर आहे. त्यांनी २० वेळा न्यूझीलंडचा पराभव केला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will rinku singh be a part of the t20 world cup team ashish nehra replied avw
Show comments