क्रीडा मंत्रालयाने कुस्ती महासंघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष संजय सिंह यांना निलंबित केलं आहे. तसेच त्यांच्या अध्यक्षतेखालील कार्यकारिणी बरखास्त केली आहे. या निर्णयाचं कुस्तीपटूंकडून स्वागत होत आहे. संजय सिंह यांची अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे नाराज झालेल्या कुस्तीपटूंनी या निर्णयावर समाधान व्यक्त केलं आहे. संजय सिंह अध्यक्ष झाल्यामुळे भारताची ऑलिम्पिक पदकविजेती कुस्तीपटू साक्षी मलिक हिने कुस्तीला कायमचा रामराम केला होता. तिनेदेखील केंद्र सरकारच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे.
२१ डिसेंबर रोजी झालेल्या कुस्ती महासंघाच्या निवडणुकीत संजय सिंह हे ४७ पैकी ४० मतं मिळवली आणि ही निवडणूक जिंकत ते भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष झाले होते. संजय सिंह हे कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांचे जवळचे सहकारी आहेत. बृजभूषण शरण सिंह यांच्यावर अनेक महिला कुस्तीपटूंनी लैंगिक अत्याचाराचे आरोप करत आंदोलन केलं होतं. या आंदोलनानंतर बृजभूषण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याव्यतिरिक्त सरकारने कोणतीही मोठी कारवाई केली नाही. केवळ त्यांना कुस्ती महासंघाची निवडणूक लढण्यास मज्जाव केला. परंतु, कुस्ती महासंघाच्या निवडणुकीत बृजभूषण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांच्या नेतृत्वातलं पॅनेल जिंकलं. त्यामुळे साक्षी मलिकने निराश होऊन कुस्तीला कायमचा रामराम करण्याचा निर्णय घेतला होता.
आता क्रीडा मंत्रालयाने संजय सिंह यांची कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी केली आहे. त्याचबरोबर संजय सिंह यांच्या अध्यक्षतेखालील कार्यकारिणी बरखास्त केली आहे. त्यामुळे साक्षी मलिक तिचा निवृत्तीचा निर्णय मागे घेणार का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यावर साक्षीने काही वेळापूर्वी प्रतिक्रिया दिली.
हे ही वाचा >> WFI : भारतीय कुस्ती महासंघाची कार्यकारिणी बरखास्त, बृजभूषण सिंह यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
साक्षीने क्रीडा मंत्रालयाच्या निर्णयावर समाधान व्यक्त केलं आहे. त्याचबरोबर ती म्हणाली, “मला केंद्र सरकारच्या या निर्णयाची अद्याप कुठेही लिखित स्वरुपात माहिती मिळालेली नाही. परंतु, क्रीडा मंत्रालयाने असा निर्णय घेतला असेल तर मी त्याचं स्वागत करते. आमचा लढा या देशाच्या सरकारविरोधात कधीच नव्हता. आमचा लढा केवळ एका माणसाविरोधात होता. आम्हाला आपल्या खेळाडूंच्या भवितव्याची चिंता आहे. नव्या मुली या येताहेत, कुस्ती खेळतायत, त्यांची आम्हाला काळजी आहे. आम्ही आमच्या पद्धतीने ही लढाई लढत आहोत. मी तर आधीच संन्यास घेतला आहे. त्यामुळे माझी आता एवढीच इच्छा आहे की आपल्या लेकींना न्याय मिळायला हवा.” दरम्यान, साक्षीला यावेळी प्रश्न विचारण्यात आला की, आता निवृत्तीचा निर्णय मागे घेणार का? यावर ती म्हणाली, जे काही पुढे ठरेल ते मी तुम्हाला सांगेन.