पहिल्या मोसमातील पहिल्या सामन्यासाठी सनरायजर्स हैदराबादचा संघ सज्ज झाला आहे. पहिल्या सामन्यात त्यांची घरच्याच मैदानात गाठ पडेल ती पुणे वॉरियर्सची. कुमार संगकारासारखा अनुभवी कर्णधार सनरायजर्सला मिळाला असून डॅरेन सॅमीसारखा ट्वेन्टी-२० विजेता कर्णधारही संघात आहे. दुसरीकडे पुण्याच्या संघाचा कर्णधार मायकेल क्लार्क दुखापतीने बेजार असल्याने त्याच्या जागी अँजेलो मॅथ्यूज संघाची धुरा वाहणार आहे.
संगकारा आणि सॅमी सनरायजर्समध्ये असल्याने त्यांची ‘थिंक टँक’ चांगलीच असेल. त्याचबरोबर वेगवान गोलंदाजीचा बादशहा डेल स्टेन संघात असल्याने त्यांच्या गोलंदाजीला चांगली धार असेल. सलामीवीर आणि गेल्या वर्षी जबरदस्त फॉर्मात असलेला शिखर धवन हा दुखापतीमुळे सामन्याला मुकणार आहे. संगकाराबरोबर कॅमेरुन व्हाइट, नॅथन मॅक्क्युलमसारखे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू संघात आहेत. संगकाराबरोबर सलामीला पार्थिव पटेल येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गोलंदाजीमध्ये स्टेन, सॅमी आणि इशांत शर्मा हे प्रतिस्पर्धी फलंदाजांना धारेवर धरतील. त्याचबरोबर संघात युवा खेळाडूंचा भरणा आहे. त्यामुळे संघात चांगलाच समतोल दिसून येतो. या युवा खेळाडूंना चांगले मार्गदर्शन मिळाल्यास त्यांची कामगिरी चांगली होऊ शकते.
पुणे वॉरियर्सच्या संघात क्लार्क नसला तरी युवराज सिंगसारखा ‘मॅचविनर’ खेळाडू आहे. त्याचबरोबर रॉबिन उथप्पा, रॉस टेलर, स्टीव्ह स्मिथ, मालरेन सॅम्युअल्स, अजंथा मेडिस, ल्यूक राइटसारखे आंतरराष्ट्रीय स्तराचा अनुभव असलेले खेळाडू संघात आहेत. त्याचबरोबर यंदाच्या रणजी मोसमात सर्वोत्तम अष्टपैलू कामगिरी करणारा अभिषेक नायर कशी कामगिरी करतो, याकडे साऱ्यांचेच लक्ष असेल.
पुण्याच्या संघाची फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये चांगला समतोल पाहायला मिळतो. फलंदाजीची धुरा युवराज, उथप्पा, टेलर यांच्या खांद्यावर असेल; तर मनीष पांडे, धीरज जाधवसारखे युवा फलंदाजही संघात आहेत. गोलंदाजीमध्ये भुवनेश्वर कुमार, ईश्वर पांडे, श्रीकांत वाघसारखे युवा वेगवान गोलंदाज संघात आहे. कर्णधार मॅथ्यूज हा नावाजलेला अष्टपैलू खेळाडू आहेच, त्याचबरोबर सॅम्युअल्स आणि अभिषेक हे अष्टपैलू खेळाडू त्याला चांगली साथ देतील. अजंथा मेंडिससारखा नावाजलेला फिरकीपटूही त्यांच्या संघात असून त्याला अमित मिश्राची चांगली साथ मिळेल.
दोन्ही संघावर नजर टाकली तर सनरायजर्सपेक्षा पुण्याचा संघ थोडासा उजवा वाटत आहे. पण सनरायजर्सचा पहिलाच सामना असल्याने त्यांच्या खेळाबद्दलचा अंदाज कोणालाच नाही. त्यामुळे शुक्रवारी या दोन्ही संघांमध्ये चुरशीचा सामना पाहायला मिळेल.
संघातील बलस्थानांवर भर असेल -संगकारा
हैदराबाद : पहिला सामना अटीतटीचा आणि चांगलाच रंगतदार होईल. कारण पुणे वॉरियर्स हा एक चांगला संघ आहे. त्यामुळे संघातील बलस्थानांवर भर देऊन आम्ही मैदानात उतरणार आहोत. आम्ही प्रत्येक संघासाठी वेगळी रणनीती आखलेली आहे. पण या रणनीतीची अंमलबजावणी कशी होते, याकडे आमचे लक्ष असेल. रणनीतीची योग्य अंमलबजावणी झाली तर नक्कीच आम्ही बाजी मारू. खेळाचा आनंद लुटायचा आमचा प्रयत्न असेल. कारण जर आम्ही खेळाचा आनंद घेतला तर प्रेक्षकांनाही सामन्याचा आनंद लुटता येईल.
आयपीएलचा थरार ‘लोकसत्ता’च्या फेसबुक पेजवर
खेळाडू कोणत्या देशाचा, संघाचा याचे कोणतेही दडपण न ठेवता क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटण्याची संधी आयपीएलमध्ये मिळते. मंतरलेल्या रात्रींमध्ये सारे क्रिकेटविश्व मश्गूल होऊन जाते. सामने सुरू झाल्यावर कैफ वाढतो, रंग चढतो, क्रिकेटप्रेमी जल्लोषाच्या रंगात रंगून जातात. यामध्ये क्रिकेटच्या दर्दी रसिकांच्या हाती काय लागते, याचा विचार केला तर त्याचे एकच उत्तर मिळते.. ‘खेळाचा थरार’. हा थरार प्रत्यक्ष अनुभवताना प्रत्येक क्षण टिपून ठेवावा, असाच असतो. कारण त्याच्याशी जुळलेल्या असतात असंख्य आठवणी. म्हणूनच, ‘लोकसत्ता’ क्रिकेटप्रेमींना देत आहे एक आगळीवेगळी संधी. आयपीएलचे सामने पाहाताना तुमच्या सेलिब्रेशनची छायाचित्रे आम्हाला पाठवा. सर्वोक्तृष्ट निवडक छायाचित्रांना ‘लोकसत्ता’च्या फेसबुक पेजवर आणि संकेतस्थळावर प्रसिद्धी दिली जाईल. ‘लोकसत्ता’चे फेसबुक पेज लाइक करून तुमची छायाचित्रे आम्हालाwww.facebook.com/LoksattaLive च्या मेसेज बॉक्समध्ये पाठवा. सोबत तुमचे नाव, पत्ता आणि फोटोची थोडक्यात पाश्र्वभूमीही अवश्य नमूद करा.
प्रतिस्पर्धी संघ
सनरायजर्स हैदराबाद : कुमार संगकारा (कर्णधार), अक्षत रेड्डी, आशिष रेड्डी, अमित मिश्रा, आनंद रंजन, अंकित शर्मा, बिपलाब समांर्ते, कॅमेरुन व्हाइट, ख्रिस लीन, डेल स्टेन, डॅरेन सॅमी, रवी तेजा, हनुमा विहारी, इशांत शर्मा, नॅथन मॅक्क्युलम, पार्थिव पटेल, प्रशांत पद्मनाभन, क्विंटन डेकॉक, सचिन राणा, शिखर धवन, सुदीप त्यागी, थलाइव्हान सरगुनाम, थिसारा परेरा आणि वीर प्रताप सिंग.
पुणे वॉरियर्स : अँजेलो मॅथ्यूज (कर्णधार), अभिषेक नायर, अजंथा मेंडिस, अली मुर्तझा, अनुस्तुप मुझुमदार, अशोक दिंडा, भुवनेश्वर कुमार, धीरज जाधव, एकलव्य द्विवेदी, हरप्रीत सिंग, ईश्वर पांडे, केन रिचर्ड्सन, कृष्णकांत उपाध्याय, ल्यूक राइट, महेश रावत, मनीष पांडे, मालरेन सॅम्युअल्स, मिचेल मार्श, मिथून मन्हास, परवेझ रसूल, राहुल शर्मा, आर. गोमेझ, रॉबिन उथप्पा, रॉस टेलर, श्रीकांत वाघ, स्टीव्ह स्मिथ, टी. सुमन, तमीम इक्बाल, उदित बिर्ला, वेन आणि युवराज सिंग.