सचिन तेंडुलकर निःसंशयपणे जगातील महान फलंदाजांपैकी एक आहे, त्याने त्याच्या कारकिर्दीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतके झळकावली आहेत. ‘रन मशीन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विराट कोहलीने आतापर्यंत ७५ शतके झळकावली आहेत. विराट कोहली सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडू शकेल का, अशी चर्चा अनेकदा होत असते. आता याचे उत्तर भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दिले आहे.
अनेक माजी क्रिकेटपटू आणि तज्ञांनी कोहलीच्या विक्रम मोडण्याच्या शक्यतेवर त्यांचे मत दिले आहे, त्यापैकी बहुतेकांनी ‘रन मशीन’ कोहलीचे समर्थन केले आहे. कोहलीने पुढील ५-६ वर्षे खेळण्यास सक्षम राहिल्यास तो नक्कीच हा विक्रम मोडू शकतो, असे दिग्गजांचे मत आहे. मात्र, टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी थोडी वेगळीच गोष्ट सांगितली आहे. शास्त्रींना खात्री आहे की कोहली आणखी ५-६ वर्षे खेळू शकेल पण सचिनचा विक्रम मोडेल अशी त्यांना खात्री नव्हती.
स्टार स्पोर्ट्स यारीशी संवाद साधताना शास्त्री म्हणाले, “किती खेळाडूंनी १०० शतके झळकावली आहेत? केवळ एका खेळाडूने ही कामगिरी केली आहे. कोहली हा टप्पा पार करू शकतो असे तुम्ही म्हणत असाल तर ती मोठी गोष्ट आहे. त्याच्यात अजून बरेच क्रिकेट बाकी आहे. तो खूप फिट आहे. त्या वर्गातील खेळाडू जेव्हा शतक झळकावायला लागतो तेव्हा तो एकामागून एक शतकांची ओळ घालतो. तो १५ सामन्यात सात शतके करू शकतो. कोहली तंदुरुस्त असल्याने तो अजूनही ५-६ वर्षे सहज क्रिकेट खेळू शकतो. पण १०० शतके गाठणे सोपे नाही कारण केवळ एका व्यक्तीने ते केले आहे. पण तो आकडा गाठू शकतो हे तुम्ही मला सांगत आहात, ही मोठी गोष्ट आहे.”
ICC चषक मिळणार थोडा धीर धरा- रवी शास्त्री
रवी शास्त्री यांनी स्टार स्पोर्ट्सवरील संभाषणात म्हटले, “माझ्या मते, मोठ्या कालावधीनंतर भारताला अजून एकही आयसीसी चषक जिंकता आलेली नाही. पण संघाने सातत्यपूर्ण कामगिरी करत अनेकदा अंतिम फेरी आणि उपांत्य फेरी गाठली आहे. मास्टर- ब्लास्टर सचिन तेंडुलकरकडे पाहा, आयसीसी चषक विजयी होण्यासाठी त्याला सहा विश्वचषक खेळावे लागले. सहा विश्वचषक म्हणजे २४ वर्षे. त्याच्या शेवटच्या विश्वचषकात त्याने जेतेपद पटकावले. तसेच लिओनेल मेस्सीकडे पाहा, त्याचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. मेस्सीने अंतिम सामन्यात देखील गोल केला. त्यामुळे तुम्हाला थोडा धीर धारा, मग चषकांचा पाऊस पडेल.”
विराट कोहलीने वन डेमध्ये ४६, टेस्टमध्ये २८ आणि टी२० मध्ये एक शतक झळकावले आहे. अशाप्रकारे त्याने एकूण ७५ शतके ठोकली आहेत. सचिन तेंडुलकरने कसोटीत ५१ आणि वन डेत ४९ शतके झळकावली आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सचिनचा ४९ शतकांचा विक्रम मोडण्यापासून विराट कोहली फक्त ४ शतके दूर आहे. त्याचबरोबर सचिनच्या एकूण १०० शतकांचा विक्रम मोडण्यासाठी विराटला आणखी २५ शतकांची गरज आहे.