राष्ट्रकुल क्रीडा स्पध्रेत हॉकीचे रौप्यपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हॉकी इंडिया, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन आणि तमाम क्रीडारसिकांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले.
उपांत्य फेरीच्या लढतीतील पहिल्या सत्रात भारतीय संघ दोन गोलने पिछाडीवर होता. परंतु नंतर भारताने न्यूझीलंडचा ३-२ असा पराभव केला. मग सरदार सिंगच्या नेतृत्वाखालील भारताने अंतिम सामन्यात जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाकडून ०-४ अशा फरकाने हार पत्करली. नवी दिल्लीमध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पध्रेच्या यशाचीच पुनरावृत्ती भारतीय संघाने केली. त्यामुळेच टेरी वॉल्श यांच्या मार्गदर्शनाखाली रौप्यपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे कौतुक करण्यात येत आहे.
भारतीय संघाचे अभिनंदन आणि स्वागत करण्यासाठी आलेले हॉकी इंडियाचे सरचिटणीस नरिंदर बात्रा म्हणाले की, ‘‘भारतीय संघाच्या कामगिरीचा मला अभिमान आहे. त्यामुळेच रौप्यपदक जिंकणाऱ्या संघाचे मी अभिनंदन करतो. त्यांच्या मेहनतीला आणि प्रयत्नांना मिळालेले हे फळ आहे.’’
या स्वागतामुळे भारावलेल्या मध्यरक्षक सरदार सिंगने सांगितले की, ‘‘क्रीडारसिक आणि मित्रांच्या या स्वागतामुळे माझा मायदेशात परतल्याचा आनंद द्विगुणित झाला आहे. येत्या आशियाई क्रीडा स्पध्रेत सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न आता आम्ही जोपासले आहे. आम्ही आता आत्मविश्वासाने आशियाई स्पध्रेत सहभागी होऊ.’’
तो पुढे म्हणाला, ‘‘राष्ट्रकुल स्पध्रेत आम्ही आमच्या अनेक उणिवांवर मात केली. त्यामुळेच आशियाई स्पध्रेत बलाढय़ संघ म्हणून आम्ही सहभागी होऊ.’’
आशियाई क्रीडा स्पध्रेच्या तयारीसाठी भारतीय संघ ६ ऑगस्टला बांगलादेश दौऱ्यावर जात असून, या दौऱ्यात तीन सामन्यांच्या मालिकेचा समावेश आहे. आशियाई क्रीडा स्पर्धा १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत इन्चॉन येथे होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा