आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू नरसिंग यादवचा निर्धार

 

जागतिक स्पर्धेत कांस्यपदक पटकावल्यानंतर आत्मविश्वास कमालीचा उंचावला आहे. त्यामुळे रिओ ऑलिम्पिकमध्येही संधी मिळाल्यास अथक मेहनत करून नक्कीच पदक पटकावेन, असा निर्धार आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू नरसिंग यादवने व्यक्त केला.

जागतिक स्पर्धेत भारताकडून नरसिंगने एकमेव पदक मिळवले आणि या बळावर भारताला ऑलिम्पिकचे दरवाजे खुले झाले आहेत. नरसिंगच्या या पराक्रमामुळे भारताचा एक खेळाडू ऑलिम्पिकसाठी पात्र ठरू शकतो. पण या स्थानासाठी रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक विजेत्या नरसिंगला पाठवायचे की अनुभवी कुस्तीपटू सुशील कुमारला हा पेच भारतीय कुस्ती असोसिएशनला सोडवावा लागणार आहे. याबाबत नरसिंग म्हणाला की, ‘‘जागतिक स्पर्धेत मी पदक जिंकले आहे. जो पात्रता स्पर्धेमध्ये पदक जिंकतो, त्यालाच ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची संधी मिळते. त्यामुळे ऑलिम्पिकसाठी बहुतांशी मलाच संधी मिळेल. त्यामुळे आता ऑलिम्पिकच्या तयारीला मी लवकरच सुरुवात करणार आहे.’’

जागतिक स्पर्धेमध्ये एकामागून एक भारताला धक्के बसत होते. या वेळी मनोबल कसे होते, याबाबत नरसिंग म्हणाला की, ‘‘योगेश्वर दत्तची दुखापत आणि त्यानंतर एकामागून एक भारतीय खेळाडूंचे होणारे पराभव यामुळे निराशेचे वातावरण होते. पण या स्पर्धेत पदक जिंकून ऑलिम्पिकसाठी पात्र होण्याची खूणगाठ मी मनाशी पक्की केली होती. या साऱ्या गोष्टींचा कोणताही विपरीत

परिणाम मी माझ्यावर होऊ दिला नाही. स्वत:च्या खेळावर लक्ष केंद्रित करत पदकाला गवसणी घातली.’’

या स्पर्धेच्या तयारीबाबत नरसिंग म्हणाला की, ‘‘या स्पर्धेसाठी विशेष मेहनत घेतली होती. माझ्या प्रतिस्पध्र्याच्या खेळाचा अभ्यास केला होता, त्यांची यापूर्वीची कामगिरी मी पाहात होतो. पदकाच्या लढतीमध्ये फक्त खेळावर लक्ष केंद्रित केले होते. काहीही करून पदक पटकावून निराशेने आलेली मरगळ दूर करायची होती आणि त्यामध्ये मी यशस्वी झाल्याचा मला आनंद आहे.

 

नरसिंगला प्रतीक्षा राज्य सरकारच्या शाबासकीची

परदेशात स्पर्धा जिंकल्यावर राज्य सरकारकडून खेळाडूंचा सत्कार करण्यात येतो आणि इनामही दिले जाते. पण महाराष्ट्रामध्ये मात्र असे होत नसल्याची खंत नरसिंगने या वेळी व्यक्त केली. तो याबाबत म्हणाला की, ‘‘मी गेल्या वर्षी आशियाई स्पर्धेमध्ये कांस्यपदक पटकावले होते, त्या वेळी माझ्या राज्यात सत्कार होईल, अशी मला आशा होती. पण त्या वेळी माझ्या कामगिरीचा गौरव करण्यात आला नाही. आता तर मी जागतिक स्पर्धेत पदक पटकावले आहे, पण अजूनही राज्य सरकारने याची दखल घेतलेली दिसत नाही. आपल्या राज्यात झालेल्या कौतुकामुळे पुढील कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळत असते.’’

 

 

 

Story img Loader