संघसंचालक रवी शास्त्री यांची सिंहगर्जना
काही मोठय़ा खेळाडूंनी नुकतीच निवृत्ती पत्करली असली तरी दक्षिण आफ्रिकेचा संघ आताही तितकाच ताकदीचा आहे. परंतु तसे असले तरी २ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या मालिकेत भारतीय संघ आपल्या आक्रमकतेचेच हत्यार जोपासणार आहे, असा विश्वास भारताचे संघसंचालक रवी शास्त्री यांनी व्यक्त केला.
निवृत्त क्रिकेटपटू जॅक कॅलिससारख्या दिग्गज खेळाडूंशिवाय आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर येत आहे, या प्रश्नाला उत्तर देताना शास्त्री म्हणाले, ‘‘सचिन तेंडुलकर, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, अनिल कुंबळे यांच्यासारखे खेळाडू निवृत्त झाल्यावर भारतीय संघ जशा संक्रमण अवस्थेतून जात होता, तशा अवस्थेतून दक्षिण आफ्रिकेचा संघ जात आहे. परंतु दक्षिण आफ्रिकेचा संघ जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे, या वस्तुस्थितीचा आपण आदर करायला हवा.’’
‘‘दक्षिण आफ्रिकेचा संघ हा कणखर प्रतिस्पर्धी आहे. क्रिकेटजगतात परदेशी वातावरणात खेळण्यात हा संघ अन्य संघांपेक्षा वाकबदार आहे. आकडेवारी नेमकी हीच गोष्ट दाखवते आहे. त्यांच्याविषयीचा आदर कायम असला तरी आम्ही कुठेही पाठ दाखवणार नाही,’’ अशी सिंहगर्जना शास्त्री यांनी केली. भारतीय संघ बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत सध्या सराव करीत आहे.
‘‘संघात कोणतेही मतभेद नाहीत. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ विश्वचषकात खेळला. त्यानंतर बांगलादेश दौऱ्यावर त्याने नेतृत्व केले. एका विश्वविजेत्या कर्णधाराच्या मार्गदर्शनाखाली संघ खेळतो आहे, मग आणखी काय हवे आहे,’’ असा सवाल शास्त्री यांनी धोनीच्या नेतृत्वाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उपस्थित केला.
फलंदाजांनी गाफील राहून चालणार नाही!
‘‘भारतीय संघातल्या कोणत्याही फलंदाजाला गाफील राहून चालणार नाही. संघाच्या गरजेनुसार कोणत्याही स्थानावर फलंदाजी करायची, त्याची तयारी हवी. मुरली विजय आणि शिखर धवन दुखापत झाल्यामुळे कठीण परिस्थिती ओढवली आणि चेतेश्वर पुजाराला संघव्यवस्थापनाने सलामीला पाठवण्याचा निर्णय घेतला, पण पुजाराने त्या संधीचे सोने केले,’’ असे शास्त्रीने सांगितले.

शास्त्री यांची द्रविडशी चर्चा
बंगळुरू : आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी कोणते युवा खेळाडू सज्ज आहेत याची चाचपणी करण्यासाठी भारतीय संघाचे संचालक रवी शास्त्री, भारतीय ‘अ’ संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड याच्याशी चर्चा करणार आहेत. आपल्याकडे मोठय़ा प्रमाणावर गुणवान खेळाडू आहेत. फक्त खोऱ्याने धावा करणारे किंवा भरपूर विकेट्स मिळवणाऱ्या खेळाडूंविषयी नव्हे तर प्रतिभावान खेळाडूंविषयी राहुलशी चर्चा करणार असल्याचे शास्त्री यांनी सांगितले. युवा खेळाडूंचा संघ बांधण्यात राहुलने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतर युवा खेळाडू घडवण्यात राहुलने मौलिक योगदान दिल्याचेही शास्त्री यांनी सांगितले.