माजी विजेता व चौथा मानांकित रॉजर फेडरर, अग्रमानांकित नोवाक जोकोव्हिच व पाचवा मानांकित स्टानिस्लास वॉवरिन्का यांनी विम्बल्डन टेनिस स्पर्धेत झकास सलामी केली. भारताच्या सोमदेव देववर्मन याला मात्र संघर्षपूर्ण लढतीनंतर पंधरावा मानांकित जेर्झी जोनोविझ याच्याकडून पराभव स्वीकारावा लागला.
या स्पर्धेतील एकतर्फी लढतीत फेडरर याने इटलीच्या पाओलो लॉरेन्सी याच्यावर ६-१, ६-१, ६-३ असा दणदणीत विजय मिळविला. प्रत्येक सेटमध्ये त्याने दोन वेळा सव्‍‌र्हिस ब्रेक मिळविला. त्याने फोरहँडच्या ताकदवान फटक्यांबरोबरच प्लेसिंगचाही कल्पकतेने उपयोग केला. चुरशीच्या लढतीत फ्रान्सच्या जो विल्फ्रेड त्सोंगा याला पहिल्या फेरीत विजय मिळविण्यासाठी झुंजावे लागले. त्याने तीन तासांच्या लढतीत ऑस्ट्रियाच्या जुर्गेन मेल्झनेर याच्यावर ६-१, ३-६, ३-६, ६-२, ६-४ असा विजय मिळविला. स्वित्र्झलडच्या स्टानिस्लास वॉवरिन्क याने पोर्तुगालच्या जोओ सौसा याच्यावर ६-३, ६-४, ६-३ अशी सरळ तीन सेट्समध्ये मात केली. नोवाक जोकोवीच या अग्रमानांकित खेळाडूने कझाकिस्तानच्या आंद्रे गोलुवेव्ह याचा ६-०, ६-१, ६-४ असा सहज पराभव केला. माकरेस बघदातीस या सायप्रसच्या खेळाडूने जर्मनीच्या डस्टीन ब्राऊन याचा ६-४, ७-५, २-६, ७-६ (९-७) असा पराभव केला. चीन तैपेईच्या येन सुआनलु याने कझाकिस्तानच्या अ‍ॅलेक्झांडर नेदोविलोव याच्यावर संघर्षपूर्ण विजय नोंदविला. पाच सेट्सपर्यंत रंगतदार झालेली ही लढत त्याने ६-४, ४-६, ६-४, १-६, ६-१ अशी जिंकली.
सोमदेव याच्यापुढे पहिल्याच सामन्यात पंधरावा मानांकित जेर्झी जोनोविझ याचे आव्हान होते. जेर्झी सहज हा सामना जिंकणार अशी आशा होती. मात्र जिगरबाज खेळाडू म्हणून ख्याती असलेल्या सोमदेव याने शेवटपर्यंत त्याला कौतुकास्पद लढत दिली. हा सामना जेर्झी याने ४-६, ६-३, ६-३, ३-६, ६-३ असा जिंकला. साडेतीन तास चाललेल्या या सामन्यात सोमदेव याने पहिल्या व चौथ्या सेटमध्ये सव्‍‌र्हिस व परतीचे फटके यावर चांगले नियंत्रण राखले होते मात्र निर्णायक सेटमध्ये त्याने सव्‍‌र्हिस गमावली. सामना संपल्यानंतर सोमदेव म्हणाला, पहिल्या फेरीत पराभूत झालो असलो तरी अनुभवी खेळाडूविरुद्ध मी चांगली लढत देऊ शकलो यातच मला समाधान आहे.
महिलांच्या विभागात १६ व्या मानांकित कॅरोलीन वोझ्नियाकी हिने इस्रायलच्या शहार पीर हिचे आव्हान ६-३, ६-० असे संपुष्टात आणले. १९ वी मानांकित सॅबिनी लिसिकी हिने इस्रायलच्या ज्युलिया ग्लुशको हिच्यावर ६-२, ६-१ असा दणदणीत विजय मिळविला. विसावी मानांकित आंद्रिया पेटकोविक हिने पोलंडच्या कॅटरिना पीटेर हिला ६-१, ६-४ असे पराभूत केले. पोलंडच्या अग्निझेका राडवानस्का हिला रुमानियाच्या आंद्रिया मित्तू हिच्याविरुद्ध ६-२, ६-१ असा विजय मिळविताना फारसे कष्ट घ्यावे लागले नाहीत.

Story img Loader