‘लाल मातीचा बादशाह’ समजल्या जाणाऱ्या राफेल नदालचे विम्बल्डच्या हिरव्यागार कोर्टवरील आव्हान ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गोसने संपुष्टात आणले. तसेच महिलांमध्ये नवव्या मानांकित अँजेलिक्यू कर्बरने पाचव्या मानांकित मारिया शारापोव्हाला नमवत सनसनाटी विजयाची नोंद केली. तथापि, रॉजर फेडररने विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.
यापूर्वी दोन वेळा विम्बल्डनचे जेतेपद पटकावणारा नदाल १५व्या ग्रँड स्लॅम जेतेपदासाठी उत्सुक होता. पण चौथ्या फेरीत त्याला किर्गोसकडून ६-७ (५), ७-५, ६-७ (५), ३-६ असा पराभव पत्करावा लागला.
काही दिवसांपूर्वीच झालेल्या फ्रेंच खुल्या स्पर्धेचे जेतेपद पटकावणारी शारापोव्हा या स्पर्धेतही जेतेपदाची मुख्य दावेदार होती. पण अटीतटीच्या मुकाबल्यात कर्बरने शारापोव्हाला ७-६ (७-४), ४-६, ६-४ असे नमवले. मात्र कर्बरने शानदार खेळ करत उपांत्यपूर्व फेरी गाठली.
माजी विजेता फेडररने अव्वल दर्जास साजेसा खेळ करीत स्पेनच्या टॉमी रॉब्रेडो याचा ६-१, ६-४, ६-४ असा दीड तासात पराभव केला. फेडरर याला येथे चौथे मानांकन मिळाले आहे. अग्रमानांकित जोकोव्हिचने फ्रान्सच्या जो विल्फ्रेड त्सोंगावर ६-३, ६-४, ७-६ (७-५) अशी मात केली. स्वित्र्झलडच्या स्टॅनिस्लास वॉवरिन्काने फेलिसिआनो लोपेझवर ७-६ (७-५), ७-६ (९-७), ६-३ अशी मात केली.
तिसऱ्या मानांकित सिमोना हॅलेपने झरीना दियासवर ६-३, ६-० असा दणदणीत विजय मिळविला.
विम्बल्डन टेनिस स्पर्धा : नदाल, शारापोव्हाला पराभवाचा धक्का
‘लाल मातीचा बादशाह’ समजल्या जाणाऱ्या राफेल नदालचे विम्बल्डच्या हिरव्यागार कोर्टवरील आव्हान ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गोसने संपुष्टात आणले. तसेच महिलांमध्ये नवव्या मानांकित अँजेलिक्यू कर्बरने पाचव्या मानांकित मारिया शारापोव्हाला नमवत सनसनाटी विजयाची नोंद केली.
First published on: 02-07-2014 at 02:01 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wimbledon 2014 roger federer to face wawrinka in last eight