हारजीतपेक्षाही अत्युच्य दर्जाच्या टेनिसची मैफल गाजवणाऱ्या विम्बल्डन स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या अंतिम मुकाबल्यात नोव्हाक जोकोव्हिचने आपली मोहर उमटवली. कलात्मक शैलीपेक्षा घोटीव सातत्याच्या बळावर जोकोव्हिचने रॉजर फेडररवर ७-६, ६-७, ६-४, ६-३ असा विजय मिळवत विम्बल्डनच्या तिसऱ्या तर कारकीर्दीतील नवव्या ग्रँड स्लॅम जेतेपदावर कब्जा केला. काही दिवसांपूर्वीच फ्रेंच खुल्या स्पर्धेत जोकोव्हिचचा विजयवारू उपांत्य फेरीतच थांबला होता. मातीवरून गवतावरच्या परिवर्तनात जोकोव्हिचने एक पाऊल पुढे टाकत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. दुसरीकडे जेतेपदापेक्षा संन्यस्त अशा दर्जेदार खेळण्यावर भर देणाऱ्या फेडररचा ग्रँड स्लॅम जेतेपदांचा दुष्काळ तिसऱ्या वर्षीही कायम राहिला.
पहिल्या सेटमध्ये फेडररने ४-२ अशी आघाडी घेतली. मात्र चिवटपणासाठी प्रसिद्ध जोकोव्हिचने हळूहळू आगेकूच करत मुकाबला टायब्रेकरमध्ये नेला. सव्र्हिसमधली हरपलेली लय आणि निर्णायक क्षणी झालेल्या दुहेरी चुका याचा फायदा उठवत जोकोव्हिचने पहिला सेट जिंकला. दुसरा सेटमध्ये रंगलेल्या अटीतटीच्या मुकाबल्यात फेडररने आपल्या गतवैभवाची झलक पेश केली. ५-५, ६-६ अशी बरोबरीत पुढे जाणाऱ्या आणि टायब्रेकरमध्ये गेलेल्या मुकाबल्यात फेडररने बाजी मारली. अगदी समीप येऊनही क्षणिक चुकांमुळे सेट गमवावा लागल्यामुळे जोकोव्हिच निराश झाला. दुसऱ्या सेटनंतर पावसाचे आगमन झाले. सक्तीच्या विश्रांतीचा पुरेपूर फायदा उठवत नव्या ऊर्जेसह जोकोव्हिच परतला. मरेविरुद्धच्या लढतीत भेदक सव्र्हिस हे फेडररचे मुख्य अस्त्र होते. मात्र अंतिम लढतीत फेडररचे हे शस्त्र म्यान झाले. झटपट गुण मिळवत जोकोव्हिचने तिसरा सेट नावावर केला. चौथ्या सेटमध्ये जोकोव्हिचने सर्वागीण खेळ आणि अचूकतेचा दर्जा उंचावत फेडररला निष्प्रभ केले. दुसऱ्या सेटमध्ये जीवाचं रान करत खेळणाऱ्या फेडररचा खेळ तिसऱ्या आणि चौथ्या सेटमध्ये घसरत गेला. चौथ्या सेटमध्ये तडाखेबंद स्मॅशच्या फटक्यासह जोकोव्हिचने विजयी आरोळी ठोकली व हाऊसफुल्ल मैदानातील प्रत्येकाने जोकोव्हिचला मानवंदना दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा