विम्बल्डनच्या उपांत्य फेरीतील दुसऱ्या सामन्यात द्वितीय मानांकित राफेल नदालचा १२व्या मानांकित नोव्हाक जोकोव्हिचने ६-४, ३-६, ७-६ (११-९), ३-६, १०-८ असा पराभव केला आणि स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. आता अंतिम सामन्यात जोकोव्हिचला उपांत्यपूर्व फेरीत फेडररला पराभूत करणाऱ्या केविन अँडरसनशी झुंजावे लागणार आहे.

काल सुरू झालेल्या सामन्यात नोवाक जोकोविच ३ पैकी २ सेट जिंकून राफेल नदालपेक्षा आघाडीवर होता. मात्र कर्फ्यु टाइममुळे हा सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार पहाटे ३.३० वाजता थांबवण्यात आला. तोपर्यंत रंगलेल्या सामन्यात पहिला सेट जोकोविचने ६-४ असा जिंकला. तर दुसरा सेट नदालने ६-३ असा जिंकत सामन्यात बरोबरी केली. तिसरा सेट टायब्रेकरपर्यंत पोहोचला. त्यात जोकोविच सरस ठरला होता.

त्यानंतर आज खेळाला पुढे सुरुवात झाली. सामन्याच्या चौथ्या सेटमध्ये नदालने ३-०ने आघाडी घेतली. त्यानंतर जोकोव्हिचनेही पुनरागमन करत बरोबरी साधली. पण अखेर नदालने आपला अनुभव पणाला लावून तो सेट जिंकला आणि सामन्यात बरोबरी राखली.

खेळ अखेर पाचव्या आणि निर्णायक सेटमध्ये आला. मात्र या सेटमध्ये नदालला आपली जादू कायम राखता आली नाही. लांबलेला पाचवा सेट जोकोव्हिचने १०-८ अशा फरकाने आपल्या नावे करत अंतिम सामन्यात धडक मारली.

Story img Loader