चार ग्रँडस्लॅमपैकी एक असलेल्या विम्बल्डन स्पर्धेचा थरार अंतिम टप्प्यात आला आहे. काल (९ जुलै) महिला एकेरीचा अंतिम सामना पार पडला. त्यात कझाकिस्तानच्या एलेना रिबाकिनाने इतिहास रचला. महिला एकेरीनंतर आता पुरूष एकेरीची सामना होणे बाकी आहे. आज (१० जुलै) लंडनमधील सेंटर कोर्टवर सर्बियाचा नोव्हाक जोकोविच आणि ऑस्ट्रेलियाचा निक किर्गिओसमध्ये यांच्यामध्ये हा सामना होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी खेळाला सुरुवात होईल.
विम्बल्डन पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत जोकोविच आणि किर्गिओस यांच्या रुपात अनुभव आणि तरुण तडफदार वृत्तीमध्ये कडवी झुंज दिसणार आहे. सर्बियाचा द्वितीय मानांकित नोव्हाक जोकोविच विक्रमी ३२व्या ग्रँडस्लॅम अंतिम सामन्यात खेळणार आहे. तर, बिगरमानांकित ऑस्ट्रेलियाचा निक किर्गिओस त्याच्या कारकिर्दीतील पहिल्या ग्रँडस्लॅम अंतिमफेरीमध्ये खेळणार आहे.
जोकोविच आणि किर्गिओस यापूर्वी दोनवेळा समोरासमोर आले आहेत. हे दोन्ही सामने ऑस्ट्रेलियन निकने जिंकलेले आहेत. दोघांचा पहिला सामना २०१७ मध्ये अकापुल्को मेक्सिको स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत झाला होती. त्यावेळी किर्गिओसने एकही सेट न गमावता जोकोविचचा ७-६, ७-५ असा पराभव केला होता.
त्यानंतर त्याचवर्षी, किर्गिओसने एटीपी मास्टर्स १००० इंडियन वेल्स सीए स्पर्धेतील सामन्यात जोकोविचचा ६-४, ७-६ असा पराभव केला होता. विशेष म्हणजे या दोन्ही सामन्यात जोकोविचला किर्गिओसची एकही सर्व्हिसही भेदता आली नव्हती. असा हा किर्गिओस, विम्बल्डनमध्ये सलग २७ सामने जिंकणाऱ्या जोकोविचचा विजय रथ रोखण्यासाठी सज्ज झाला आहे.
हेही वाचा – IND vs ENG T20 Series: विजयानंतर भारतीय संघाला ड्रेसिंग रूममध्ये मिळाले सरप्राईज!
२००२ मध्ये ल्युटन हेविटने विम्बल्डन पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकले होते. त्यानंतर अद्याप कोणत्याही ऑस्ट्रेलियन पुरुष खेळाडूने विम्बल्डन जिंकले नाही. त्यामुळे २० वर्षांनंतर विम्बल्डनचे जेतेपद पटकावण्याची आशा घेऊन किर्गिओसची मैदानावर उतरेल.
निकची ‘बॅडबॉय’ इमेज संपणार का?
निक किर्गिओस त्याच्या रागीट स्वभावासाठी ओळखला जातो. त्याच्या या रागापायी त्याला एकाच विम्बल्डनमध्ये दोनदा दंड ठोठावण्यात आला आहे. पाच सेटच्या पहिल्या फेरीच्या सामन्यात पॉल झुबचा पराभव केल्यानंतर तो प्रेक्षकांवर थुंकला होता. म्हणून त्याला दंड ठोठावण्यात आला होता. विजेतपद जिंकून निक आपली ‘बॅडबॉय’ इमेजवर पांघरून घालण्यात यशस्वी होणार का? याबाबत उत्सुकता आहे.