चार ग्रँडस्लॅमपैकी एक असलेल्या विम्बल्डन स्पर्धेचा थरार लंडनमध्ये सुरू आहे. आज (१० जुलै) लंडनमधील सेंटर कोर्टवर सर्बियाचा नोव्हाक जोकोविच आणि ऑस्ट्रेलियाचा निक किर्गिओसमध्ये यांच्यामध्ये पुरुष एकेरीचा सामना रंगला. ग्रास कोर्टचे अनभिषिक्त सम्राट आपणच असल्याचे सर्बियाच्या जोकोविचने आजच्या विजयाने सिद्ध केले आहे. त्याने ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसचा ४-६, ६-३, ६-४,७-६(७/३) असा पराभव करून आपल्या सातव्या विम्बल्डन जेतेपदावर नाव कोरले. हे त्याचे २१वे ग्रँडस्लॅम ठरले आहे.
आपली पहिलीच ग्रँडस्लॅम अंतिम फेरी खेळत असेलेल्या किर्गिओसने जोकोविचला कडवी टक्कर दिली. सुरुवातीचा सेट जिंकून निकने आघाडी घेतली होती. मात्र, त्यानंतर जोकोविचने शानदार खेळ केला. त्यानंतर चौथ्या सेटमध्ये सामना टायब्रेकरमध्ये गेला. तिथे जोकोविचने ६-१ अशी आघाडी घेतली. जोकोविचचे हे एकूण २१ वे ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. आता त्याच्या पुढे फक्त राफेल नदाल आहे. नदालने आतापर्यंत २२ ग्रँडस्लॅम जिंकलेली आहेत.
पाहा व्हिडीओ –
१९६८ पासून ओपन एरामध्ये सर्वाधिक विम्बल्डन जिंकण्यामध्ये जोकोविच दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर त्याच्या पुढे आहे. फेडररने आतापर्यंत आठ विम्बल्डन जिंकलेले आहेत. सातव्यांदा विम्बल्डन विजेता बनून जोकोविचने अमेरिकेच्या पीट सॅम्प्रासची बरोबरी केली आहे.
यापूर्वी जोकोविच आणि किर्गिओस यापूर्वी दोनवेळा समोरासमोर आले आहेत. हे दोन्ही सामने ऑस्ट्रेलियन निकने जिंकले होते. दोघांचा पहिला सामना २०१७ मध्ये अकापुल्को मेक्सिको स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत झाला होती. त्यानंतर त्याचवर्षी, किर्गिओसने एटीपी मास्टर्स १००० इंडियन वेल्स सीए स्पर्धेतील सामन्यात जोकोविचचा ६-४, ७-६ असा पराभव केला होता. विशेष म्हणजे या दोन्ही सामन्यात जोकोविचला किर्गिओसची एकही सर्व्हिसही भेदता आली नव्हती. यावेळी मात्र, जोकोविचने आपला संपूर्ण अनुभव पणाला लावून विजय मिळवला.