चार ग्रँडस्लॅमपैकी एक असलेल्या विम्बल्डन स्पर्धेचा थरार अंतिम टप्प्यात आला आहे. आज (१० जुलै) लंडनमधील सेंटर कोर्टवर सर्बियाचा नोव्हाक जोकोविच आणि ऑस्ट्रेलियाचा निक किर्गिओसमध्ये यांच्यामध्ये हा सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांची मजा घेण्यास सुरुवात केली आहे. यादरम्यान निकने किर्गिओसने तर जोकोविचसोबत पार्टीची एक योजनाही तयार केली आहे.
किर्गिओसने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर दोघांमधील सुधारित संबंधांबद्दल एक ट्विट पुन्हा पोस्ट केले. त्यानंतर हा सर्व किस्सा सुरू झाला. निकने ट्विट पोस्ट करत जोकोविचला विचारले, ‘आपण आता मित्र आहोत ना’? त्यानंतर जोकोविचने निकच्या इन्स्टाग्राम स्टोरीला उत्तर दिले. “जर तू मला ड्रिंक किंवा डिनरसाठी आमंत्रित करत असशील तर मी मैत्री स्वीकारतो. जो जिंकेल तो बिलाचे पैसे देईल,” असे जोकोविच म्हणाला. त्यावर किर्गिओसने पुन्हा उत्तर दिले. तो म्हणाला, “डील, चल एका नाईट क्लबमध्ये जाऊ आणि मज्जा करू.” टेनिस चाहत्यांना दोघांची ही जुगलबंदी आवडली आहे.
जोकोविच आणि किर्गिओस यापूर्वी दोनवेळा समोरासमोर आले आहेत. हे दोन्ही सामने ऑस्ट्रेलियन निकने जिंकलेले आहेत. दोघांचा पहिला सामना २०१७ मध्ये अकापुल्को मेक्सिको स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत झाला होती. त्यानंतर त्याचवर्षी, किर्गिओसने एटीपी मास्टर्स १००० इंडियन वेल्स सीए स्पर्धेतील सामन्यात जोकोविचचा ६-४, ७-६ असा पराभव केला होता. विशेष म्हणजे या दोन्ही सामन्यात जोकोविचला किर्गिओसची एकही सर्व्हिसही भेदता आली नव्हती.