टेनिस जगतामध्ये सध्या विम्बल्डनचा थरार सुरू आहे. चार प्रतिष्ठित ग्रँडस्लॅम स्पर्धांपैकी एक असलेल्या या स्पर्धेत भारताची तारांकित खेळाडू सानिया मिर्झा धडाकेबाज कामगिरी करत आहे. तिने क्रोएशियन साथीदार मेट पेव्हिकसह विम्बल्डनमधील मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात तिने गॅब्रिएला डुब्रोव्स्की आणि जॉन पीअर्स या जोडीचा ६-४, ३-६, ७-५ असा पराभव केला.
सानिया आणि पेव्हिक या सहाव्या मानांकित जोडीने चौथ्या मानांकित गॅब्रिएला डुब्रोव्स्की-जॉन पियर्स यांचा एक तास ४१ मिनिटे रंगलेल्या लढतीत पराभव केला. आता उर्वरित दोन सामने जिंकून सानियाला तिचे शेवटचे विम्बल्डन संस्मरणीय बनवायचे आहे. तिने प्रथमच विम्बल्डन ओपनच्या मिश्र दुहेरी प्रकारात उपांत्य फेरी गाठली. सानिया मिर्झाची ही शेवटची विम्बल्डन स्पर्धा आहे. या मोसमानंतर टेनिसमधून निवृत्ती घेणार असल्याचे तिने आधीच जाहीर केले आहे.
हेही वाचा – जसप्रीत बुमराहच्या कर्णधारपदाबाबत दिग्गज ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूचे मोठे वक्तव्य, म्हणाले…
उपांत्य फेरीत सानिया आणि पेव्हिकची जोडी दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीतील विजेत्याशी भिडणार आहे. उपांत्यपूर्व फेरीतील दुसरा सामना डेजारे-नील स्कुप्स्की या द्वितीय मानांकित जोडी आणि सातव्या मानांकित जेलेना ओस्टापेन्को-रॉबर्ट फराह यांच्यात आहे. सानियाने महिला दुहेरी गटातही भाग घेतला होता. परंतु, ती आणि तिची चेक जोडीदार लुसी ह्राडेका पहिल्याच सामन्यात बाहेर गेल्या होत्या.