विम्बल्डन :टय़ुनिशियाची सहावी मानांकित ओन्स जाबेऊर आणि चेक प्रजासत्ताकची बिगरमानांकित मार्केटा वोंड्रोसोव्हा यांनी गुरुवारी विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली. या दोघींमधील जेतेपदाची लढत शनिवार, १५ जुलैला पार पडेल.
पहिल्या उपांत्य सामन्यात वोंड्रोसोव्हाने युक्रेनच्या एलिना स्विटोलिनाला ६-३, ६-३ असे पराभूत केले. स्विटोलिनाने उपांत्यपूर्व फेरीत अग्रमानांकित इगा श्वीऑनटेकला पराभूत केल्याने तिच्या कामगिरीकडे सर्वाचे लक्ष होते. मात्र, स्विटोलिनाने निराशा केली. सामन्याच्या सुरुवातीपासून अप्रतिम खेळ करताना वोंड्रोसोव्हाने स्विटोलिनावर सरल सेटमध्ये विजय नोंदवला. यासह खुल्या युगातील स्पर्धामध्ये विम्बल्डनची अंतिम फेरी गाठणारी वोंड्रोसोव्हा ही पहिली बिगरमानांकित खेळाडू ठरली.
दुसऱ्या उपांत्य सामन्यात गतउपविजेत्या जाबेऊरने अरिना सबालेन्काचा ६-७ (५-७), ६-४, ६-३ असा पराभव केला. सामन्यातील पहिला सेट सबालेन्काने टायब्रेकरमध्ये जिंकत चांगली सुरुवात केली. दुसऱ्या सेटमध्ये मात्र जाबेऊरने आपला खेळ उंचावला. तिने हा सेट ६-४ असा जिंकत सामना बरोबरीत आणला. तिसऱ्या सेटमध्येही जाबेऊरने आपली हीच लय कायम राखताना विजय नोंदवला.
बोपण्णा-एब्डेन जोडी पराभूत
भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा ऑस्ट्रेलियाचा साथीदार मॅथ्यू एब्डेन यांना गुरुवारी पुरुष दुहेरीच्या उपांत्य सामन्यात नेदरलँड्सच्या वेस्ले कूलहॉफ आणि ग्रेट ब्रिटनच्या नील स्कूपस्की जोडीकडून
५-७, ४-६ अशी हार पत्करावी लागली. या पराभवासह बोपण्णा व एब्डेन जोडीचे पुरुष दुहेरीतील आव्हान संपुष्टात आले.