विम्बल्डन : सर्बियाचा २३ ग्रँडस्लॅम विजेता नोव्हाक जोकोव्हिच आणि ग्रीसचा पाचवा मानांकित स्टेफानोस त्सित्सिपास यांनी संघर्षपूर्ण विजयांसह विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरी गटात आगेकूच केली. महिला एकेरीत चेक प्रजासत्ताकच्या पेट्रा क्विटोवा व व्हिक्टोरिया अझरेन्का यांनी विजय नोंदवले.
दुसऱ्या मानांकित जोकोव्हिचला विजयासाठी संघर्ष करावा लागला. मात्र, त्याने मोक्याच्या क्षणी आपला खेळ उंचावत ऑस्ट्रेलियाच्या जॉर्डन थॉम्पसनवर ६-३, ७-६ (७-४), ७-५ अशी मात केली. अन्य चुरशीच्या सामन्यात त्सित्सिपासने ऑस्ट्रियाच्या डॉमनिक थीमवर ३-६, ७-६ (७-१), ६-२, ६-७ (५-७), ७-६ (१०-८) असा विजय मिळवला. इटलीच्या लोरेंझो मुसेट्टीने स्पेनच्या क्वामे मुनारला ६-४, ६-३, ६-१ असे नमवले. चौथ्या मानांकित नॉर्वेच्या कॅस्पर रूडला ब्रिटनच्या लियाम ब्रॉडीकडून ६-४,३-६, ४-६, ६-३, ६-० अशा पराभवाचा सामना करावा लागला.
महिला एकेरीत क्विटोवाने जॅस्मिन पाओलिनीवर ६-४, ६-७ (५-७), ६-१ असा विजय मिळवला. अझरेन्काने नादिया पोडोरोस्काला ६-३, ६-० असे पराभूत केले. ३५० जोकोव्हिचचा हा ३५०वा ग्रँडस्लॅम विजय ठरला. अशी कामगिरी करणारा तो रॉजर फेडररनंतरचा (३६९) केवळ दुसरा पुरुष टेनिसपटू ठरला आहे.