लंडन : सातव्या मानांकित इटलीच्या जॅस्मिन पाओलिनीने संघर्षपूर्ण लढतीत क्रोएशियाच्या डोना वेकिचचा पराभव करत कारकीर्दीत प्रथमच विम्बल्डन टेनिस स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. जेतेपदासाठी तिची गाठ चेक प्रजासत्ताकच्या बार्बोरा क्रेजिकोवाशी पडणार आहे. उपांत्य लढतीत पाओलिनीने वेकिचवर २-६, ६-४, ७-६ (१०-८) असा विजय मिळवला. त्यामुळे २०१६ नंतर एकाच हंगामात फ्रेंच आणि विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारी ती पहिलीच महिला टेनिसपटू ठरली. त्या वेळी सेरेना विल्यम्सने अशी कामगिरी केली होती.

हेही वाचा >>> कोलंबियाची दमदार कामगिरी कायम; उरुग्वेला हरवत अंतिम फेरीत; लेर्माचा निर्णायक गोल

उपांत्य फेरीच्या लढतीत पाओलिनीला वेकिचकडून कडवा प्रतिकार सहन करावा लागला. वेकिचने झंझावाती सुरुवात करताना पहिला सेट जिंकला. मात्र, दुसऱ्या सेटमध्ये पाओलिनीने पुनरागमन केल्याने सामन्यात बरोबरी झाली. तिसऱ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी आपला सर्वोत्तम खेळ केला. त्यामुळे सेटमधील बरोबरीची कोंडी फोडण्यासाठी टायब्रेकर खेळवावा लागला. यात पाओलिनीने १०-८ अशी बाजी मारत अंतिम फेरीत स्थान मिळवले. अन्य उपांत्य लढतीत क्रेजिकोवाने एलिना रायबाकिनाचा ३-६, ६-३, ६-४ असा पराभव केला.