जेतेपदापर्यंतची वाट किती खडतर होऊ शकते याचा प्रत्यय बुधवारी विम्बल्डन स्पर्धेत इंग्लंडच्या अँडी मरेला आला. थरारक लढतीत मरेने स्पेनच्या फर्नाडो व्हर्डास्कोवर   ४-६, ३-६, ६-१, ६-४, ७-५ अशी मात करत उपांत्य फेरी गाठली. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या नोव्हाक जोकोव्हिचने चेक प्रजासत्ताकच्या टॉमस बर्डीचचा धुव्वा उडवत उपांत्य फेरीत धडक मारली. दुसऱ्या लढतीत अर्जेटिनाच्या ज्युआन मार्टिन डेल पोट्रोने स्पेनच्या डेव्हिड फेररला चीतपट करत उपांत्य फेरीत स्थान पटकावले. जोकोव्हिचने बर्डीचचे आव्हान ७-६ (५), ६-४, ६-३ असे संपुष्टात आणत सलग १३व्या ग्रँड स्लॅम उपांत्य फेरीत धडक मारली. दुखापतीवर मात करत डेल पोट्रोने फेररला ६-२, ६-४, ७-६ (७-५) असे नमवत दिमाखात उपांत्य फेरी गाठली.

बोपण्णा, मिर्झाची आगेकूच
रोहन बोपण्णा आणि सानिया मिर्झा यांनी विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली. बोपण्णाने चीनच्या जि झेंगच्या साथीने खेळताना जोहान ब्रुनस्टॉर्म आणि कॅटालिन मारोसी जोडीवर ७-६ (४), ३-६, ६-१ अशी मात केली. सानियाने होरिआ टेकाऊसह खेळताना इरिक ब्युटोरॅक आणि अलिझ कॉर्नेट जोडीचा ६-१, ७-५ असा धुव्वा उडवला. मिश्र दुहेरीपाठोपाठ पुरुष दुहेरीतही महेश भूपतीचे आव्हान संपुष्टात आले. अमेरिकेच्या अनुभवी बॉब आणि माइक ब्रायन जोडीने भूपती-कोन्ले जोडीवर मात केली.

Story img Loader