नोव्हाक जोकोव्हिच आणि अँडी मरे हे विम्बल्डन स्पर्धेच्या जेतेपदापासून दोन विजय दूर आहेत. आता या दोघांना उपांत्य फेरीचा महत्त्वपूर्ण अडथळा पार करायचा आहे. सामन्यादरम्यान झालेल्या गुडघ्याच्या गंभीर दुखापतीतून सावरत अर्जेटिनाच्या ज्युआन मार्टिन डेल पोट्रोसमोर जोकोव्हिचसारख्या तगडय़ा प्रतिस्पध्र्याचे आव्हान आहे. फेडरर-नदाल-जोकोव्हिच त्रिकुटाची सद्दी मोडून काढत २००९ मध्ये डेल पोट्रोने अमेरिकन खुल्या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. त्रिकुटापैकी उरलेल्या जोकोव्हिचला नमवत इतिहास घडवण्याची डेल पोट्रोला संधी आहे. डेल पोट्रोविरुद्ध जोकोव्हिचची कामगिरी ८-३ अशी कामगिरी आहे, मात्र गेल्याचवर्षी ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकाच्या लढतीत विम्बल्डनच्या कोर्ट्सवर डेल पोट्रोने जोकोव्हिचला नमवले होते. जोकोव्हिच सलग १३वी ग्रँड स्लॅम उपांत्य फेरीचा सामना खेळणार आहे. सातवे ग्रँडस्लॅम जेतेपद नावावर करण्यासाठी जोकोव्हिच आतुर आहे.
दुसऱ्या लढतीत मरेचा मुकाबला पोलंडच्या जेर्झी जॅन्कोविझशी होणार आहे. ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम चारमध्ये धडक मारणारा जॅन्कोविझ पोलंडचा पहिला पुरुष खेळाडू ठरला आहे. अनुभवाच्या बाबतीत जॅन्कोविझ कमकुवत आहे मात्र वर्डास्कोविरुद्ध मरेलाही विजयासाठी चांगलंच झगडावे लागले होते. गेल्या वर्षी उपविजेतेपदावर समाधान मानावे लागलेल्या मरेला यंदा झळाळता चषक नावावर करण्याची चांगली संधी आहे.