क्षणाक्षणाला प्रतिस्पर्धी खेळाडूच्या बाजूने झुकणारे पारडे, स्वत:चे अनुभव पणाला लावून स्वित्र्झलडचा रॉजर फेडरर आणि सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच यांनी केलेला सवरेत्कृष्ट खेळ आणि सुपर टायब्रेकरमध्ये जोकोव्हिचने दाखवलेल्या संयमाने विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीची अंतिम फेरी गाजली. तब्बल चार तास आणि ५५ मिनिटे रंगलेल्या या सामन्यात अग्रमानांकित जोकोव्हिचने दुसऱ्या मानांकित फेडररला ७-६ (७-५), १-६, ७-६ (७-४), ४-६, १३-१२ (७-३) असे पराभूत केले. जोकोव्हिचचे हे पाचवे, तर सलग दुसरे विम्बल्डन विजेतेपद ठरले.

पहिल्या सेटपासूनच दोन्ही मातब्बर खेळाडूंमध्ये कमालीची चुरस पाहायला मिळाली. दुसऱ्या मानांकित फेडररने पहिला सेट जिंकून धडाक्यात सुरुवात केली. परंतु दुसऱ्या सेटमध्ये फेडररने दोन फोरहँडचे फटके कोर्टबाहेर मारल्यामुळे जोकोव्हिचला सहज गुण मिळाले. जोकोव्हिचने हा गेम जिंकून १-१ अशी बरोबरी साधली. दोघांनीही आपापल्या सव्‍‌र्हिसचे सेट जिंकल्यामुळे सामना टायब्रेकरमध्ये पोहोचला. जोकोव्हिचने ३-२ अशी आघाडी घेतलेली असताना फेडररने अनुभव पणाला लावून ५-३ असे वर्चस्व मिळवले. परंतु जोकोव्हिचने संयम बाळगून ७-५ असा टायब्रेकर जिंकून ७-६ (७-५) असा पहिला सेट जिंकला.
दुसऱ्या सेटमध्ये फेडररने जोकोव्हिचला पार निष्प्रभ केले. फेडररने फक्त ४५ मिनिटांमध्ये ६-१ अशा फरकाने हा सेट जिंकून सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली.

तिसऱ्या सेटमध्ये पुन्हा एकदा दोघांमध्ये कडवा संघर्ष पहावयास मिळाला. हा सेटही टायब्रेकर पोहोचला. परंतु येथेही जोकोव्हिचने सरशी साधून ७-४ अशा फरकाने टायब्रेकर जिंकून सामन्यात पुन्हा आघाडी मिळवली. चौथ्या सेटमध्ये जोकोव्हिचने दुसऱ्या सेटच्या तुलनेत फेडररला विजयसाठी संघर्ष करायला लावला. परंतु बॅकहँडच्या फटक्यांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फेडररने ६-४ असा सेट जिंकून सामन्यात २-२ अशी बरोबरी साधली.

मात्र दोघांमधील खऱ्या संघर्षांला सुरुवाती झाली ती पाचव्या व निर्णायक सेटमध्ये. क्षणाक्षणाला पारडे एकमेकाच्या बाजूने झुकवणाऱ्या या सेटमध्ये दोघांनीही सर्वस्व पणाला लावले. जोकोव्हिचने ४-२ अशी आघाडी घेत फेडररवर दडपण आणल्यामुळे फेडरर चाहत्यांचा काळजाचा ठोका चुकला. परंतु इतक्या सहज हार मानेल तो फेडरर कसला. त्यानेही झोकात पुनरागमन करून या सेटमध्ये ४-४ अशी बरोबरी साधली.

सेट ८-८ असा बरोबरीत असताना फेडररने जोकोव्हिचची सव्‍‌र्हिस ब्रेक करून ९-८ अशी आघाडी घेतल्यामुळे फेडररला सामना जिंकण्याची संधी होती. परंतु जोकोव्हिचनेसुद्धा फेडररची सव्‍‌र्हिस ब्रेक केल्यामुळे पुन्हा ९-९ असा सामना रंगला. त्यानंतर १२-१२ अशा गेममध्ये सामना पोहचल्यानंतर सुपर टायब्रेकरचा अवलंब करण्यात आला आणि त्यामध्ये जोकोव्हिचने बाजी मारली.

Story img Loader