अ‍ॅमेली मॉरेस्मो या महिला प्रशिक्षकासह खेळताना जेतेपदाचा दुष्काळ संपवून विम्बल्डनचे जेतेपद राखण्यासाठी अँडी मरे आतूर होता. सोमवारीत्याने विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेत विजयी सलामी नोंदवून त्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे. महिलांमध्ये व्हिक्टोरिया अझारेन्का, लि ना यांनी विजयी आगेकूच केली. मात्र समंथा स्टोसूर आणि स्लोअन स्टीफन्स या मानांकित खेळाडूंना पराभवाला सामोरे जावे लागले. तृतीय मानांकित मरेने बेल्जियमच्या डेव्हिड गॉफिनवर ६-१, ६-४, ७-५ असा सरळ सेट्समध्ये विजय मिळवला. दुसऱ्या व तिसऱ्या सेटमध्ये त्याला झगडावे लागले. सहाव्या मानांकित टॉमस बर्डीचने पहिला सेट गमावल्यानंतर बहारदार खेळ करीत रुमानियाच्या व्हिक्टर हानेस्कूला नमवले. त्याने ही लढत ६-७ (५-७), ६-१, ६-४, ६-३ अशी जिंकला. ऑस्ट्रेलियाच्या मेरिन्को मात्सोविचने १६व्या मानांकित फर्नाडो व्हर्डास्कोला ६-४, ४-६, ६-४, ६-२ असे नमवले.
महिलांमध्ये द्वितीय मानांकित लि ना हिने पोलंडच्या पॉला कानियावर ७-५, ६-१ अशी मात केली. माजी विजेत्या व्हीनस विल्यम्सला पहिल्याच फेरीत विजय मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागला. व्हीनसने स्पेनच्या मारिया तेरेसा टोरोफ्लोरवर ६-४, ४-६, ६-२ असा विजय मिळविला.
आठव्या मानांकित अझारेन्काने क्रोएशियाच्या मिर्जाना ल्युसिक बरोनीचा ६-३, ७-५ असा पराभव केला. याचप्रमाणे बेल्जियमच्या यानिना विकमेयरने १७व्या मानांकित स्टोसूरवर ६-३, ६-४ असा सनसनाटी विजय मिळविला. मारिया किरिलेन्कोने १८व्या मानांकित स्लोअन स्टीफन्सला ६-२, ७-६ (८-६) असे नमवत खळबळजनक विजय नोंदवला.

Story img Loader