वृत्तसंस्था, विम्बल्डन : दुसरा मानांकित नोव्हाक जोकोव्हिच, अग्रमानांकित स्पेनचा कार्लोस अल्कराझ, तिसरा मानांकित डॅनिल मेदवेदेव व पाचवा मानांकित स्टेफनोस त्सित्सिपास यांनी आपापल्या सामन्यात विजय नोंदवत विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरी गटाच्या पुढच्या फेरीत प्रवेश मिळवला. महिलांमध्ये पोलंडची अग्रमानांकित इगा श्वीऑनटेकने आपली विजय लय कायम राखली, तर सहावी मानांकित ओन्स जाबेऊर, अमेरिकेची जेसिका पेगुला आणि युक्रेनची एलिना स्वितोलिना यांनी विजय साकारले.
सर्बियाच्या जोकोव्हिचने स्वित्र्झलडच्या स्टॅन वाविरकावर ६-३, ६-१, ७-६ (७-५) असा सरळ सेटमध्ये विजय नोंदवला. सामन्यातील पहिले दोन सेट सहज जिंकल्यानंतर तिसऱ्या सेटमध्ये वाविरकाने त्याला आव्हान दिले. मात्र, जोकोव्हिचने टायब्रेकरमध्ये सेट जिंकत सामन्यात विजय मिळवला. अन्य सामन्यात, अल्कराझने चिलीच्या निकोलस जॅरीवर ६-३, ६-७ (६-८), ६-३, ७-५ असा विजय मिळवला. तर, मेदवेदेवने हंगेरीच्या माटरेन फुक्सोव्हिक्सला ४-६, ६-३, ६-४, ६-४ अशा फरकाने नमवले. त्सित्सिपासनेही आपली विजयी लय कायम राखताना सर्बियाच्या लास्लो जेरेला ६-४, ७-६ (७-५), ६-४ असे पराभूत केले.
महिला एकेरीच्या सामन्यात श्वीऑनटेकने क्रोएशियाच्या पेट्रा मार्टिचला ६-२, ७-५ असे नमवले. सामन्यातील पहिला सेट सहज जिंकल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये श्वीऑनटेकला मार्टिचने आव्हान दिले. मात्र, श्वीऑनटेकने चमक दाखवत विजय साकारला. टय़ुनिशियाच्या जाबेऊरने चीनच्या बाइ हिच्यावर ६-१, ६-१ असा सोपा विजय नोंदवला. पेगुलाने इटलीच्या एलिसाबेटा कोकिआरेट्टोला ६-४, ६-० अशा फरकाने नमवत पुढची फेरी गाठली, तर, स्वितोलिनाने सोफिया केनिनला ७-६ (७-३), ६-२ असे नमवले.
बोपण्णा-एबडेन जोडीचा विजय
भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा ऑस्ट्रेलियन साथीदार मॅथ्यू एबडेन यांनी पुरुष दुहेरीच्या पहिल्या फेरीत अर्जेटिनाच्या गुइलेर्मो डुरान व टॉमस मार्टिन एचेवेरी जोडीला ६-२, ६-७ (५-७), ७-६ (१०-८) असे नमवले. भारतीय जोडी जीवन नेदुनचेझियान व एन. श्रीराम बालाजी यांना अमेरिकेच्या ऑस्टिन क्राजिचेक व क्रोएशियाच्या इवान डॉडिज जोडीकडून ६-७ (५-७), ४-६ असे पराभूत व्हावे लागले.