वृत्तसंस्था, विम्बल्डन
अग्रमानांकित पोलंडच्या इगा श्वीऑनटेकचे विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेतील आव्हान मंगळवारी उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. श्वीऑनटेकला बिगरमानांकित युक्रेनच्या एलिना स्विटोलिनाने पराभवाचा धक्का दिला.चार ग्रँडस्लॅम विजेत्या श्वीऑनटेकने विम्बल्डनमध्ये प्रथमच उपांत्यपूर्व फेरीचा टप्पा गाठला होता. मात्र, या फेरीत तिला स्विटोलिनाने ५-७, ७-६ (७-५), २-६ असे पराभूत केले. त्यामुळे गेल्या चारपैकी तीन वर्षांत फ्रेंच खुल्या स्पर्धेचे जेतेपद मिळवणाऱ्या श्वीऑनटेकचे प्रथमच विम्बल्डन जिंकण्याचे स्वप्न अधुरेच राहिले.
२८ वर्षीय स्विटोलिनाने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मुलीला जन्म दिला आणि या वर्षी एप्रिलमध्ये तिने टेनिस कोर्टवर पुनरागमन केले. त्यानंतर फ्रेंच खुल्या स्पर्धेत तिने उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. विम्बल्डनमध्ये थेट प्रवेश मिळाल्यानंतरही स्विटोलिनाने चमकदार कामगिरी केली आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात स्विटोलिनाने सुरुवातीपासून अप्रतिम खेळ केला. तिने श्वीऑनटेकची सव्र्हिस एकदा तोडत पहिला सेट आपल्या नावे केला. दुसरा सेट टायब्रेकरमध्ये गेला आणि यात श्वीऑनटेकला विजय मिळवण्यात यश आले. तिसऱ्या सेटमध्ये मात्र स्विटोलिनाच्या आक्रमक आणि अचूक फटक्यांचे श्वीऑनटेककडे उत्तर नव्हते.
‘‘मी उपांत्य फेरी गाठेन आणि जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या खेळाडूला पराभूत करेन असे स्पर्धेच्या सुरुवातीला मला कोणी सांगितले असते, तर मी त्यावर विश्वास ठेवू शकले नसते. या स्पर्धेतील कामगिरीबाबत मी आनंदीत आहे,’’ असे स्विटोलिना म्हणाली. उपांत्य फेरीत स्विटोलिनासमोर मार्केटा वोन्ड्रोउसोवाचे आव्हान असेल.
बोपण्णा-एब्डेन उपांत्यपूर्व फेरीत
भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा ऑस्ट्रेलियन साथीदार मॅथ्यू एब्डेन यांनी पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. बोपण्णा-एब्डेन जोडीने उपउपांत्यपूर्व फेरीत मंगळवारी डेव्हिड पेल आणि रीस स्टाल्डेर जोडीला ७-५, ४-६, ७-६ (१०-५) असे पराभूत केले.