गतविजेत्या वेस्ट इंडिजने बांगलादेशविरुद्ध ७३ धावांनी शानदार विजय मिळवत आयसीसी ट्वेन्टी-२० स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या आपल्या आशा जिवंत राखल्या. ड्वेन स्मिथच्या शैलीदार अर्धशतकाने विंडीजच्या विजयाचा पाया रचला, तर सॅम्युअल बद्रीच्या प्रभावी गोलंदाजीने कळस गाठला.
प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने २० षटकांत ७ बाद १७१ धावा केल्या. त्याचे श्रेय ड्वेन स्मिथ व ख्रिस गेल यांच्या ९७ धावांच्या आक्रमक सलामीला द्यावे लागेल. स्मिथने ४३ चेंडूंत १० चौकार व तीन षटकारांसह ७२ धावा केल्या. गेलने ४८ चेंडूंत ४८ धावा करताना तीन चौकार व दोन षटकार अशी फटकेबाजी
केली. बांगलादेशकडून अल-अमिन हुसेनने २१ धावांमध्ये ३
बळी घेतले.
वेस्ट इंडिजच्या १७२ धावांच्या आव्हानाला सामोरे जाताना बांगलादेशच्या फलंदाजांनी सपशेल हाराकिरी केली. त्यांनी पहिले तीन बळी केवळ १६ धावांत गमावले. तेथून सुरू झालेली पडझड अपेक्षेइतकी सावरली गेली नाही. मुशफिकर रहीम (२२), मोमीनुल हक (१६), मशरफी मुर्तझा (१९) यांचा अपवाद वगळता त्यांचा एकही फलंदाज फार वेळ टिकू शकला नाही. विंडीजकडून सॅम्युअल बद्री याने केवळ १५ धावांत ४ बळी तर क्रिश्मर सँटोकीने १७ धावांत ३ बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक
वेस्ट इंडिज : २० षटकांत ७ बाद
१७१ (ड्वेन स्मिथ ७२, ख्रिस गेल
४८; अल अमीन हुसेन ३/२१)
विजयी वि. बांगलादेश : १९.१ षटकांत सर्व बाद ९८ (मोमीनुल हक १६, मुशफिकर रहीम २२,मशरफी
मुर्तझा १९; सॅम्युअल बद्री ४/१५, क्रिश्मर सँटोकी ३/१७, आंद्रे रसेल २/१०).
सामनावीर : ड्वेन स्मिथ.

Story img Loader