महिला विश्वचषक २०२२ च्या १७ व्या सामन्यादरम्यान मैदानावर एक धक्कादायक घटना घडली. वेस्ट इंडिजची वेगवान गोलंदाज शमिलिया कोनेल ही क्षेत्ररक्षण करत असताना मैदानावरच पडली. यानंतर तिला रुग्णवाहिकेतून मैदानाबाहेर नेण्यात आले. वेस्टइंडिज आणि बांग्लादेश यांच्यात सामना सुरू असताना ही घटना घडली.
बांगलादेशच्या डावाच्या ४७ व्या षटकात चक्कर आल्याने शमिलिया कोनेल जमिनीवर पडल्याची घटना घडली. कोनेल जमिनीवर पडल्यानंतर पंचांनी खेळ थांबवला आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना बोलावण्यात आले.
ही घटना घडली तेव्हा सामना अत्यंत रोमांचकारी वळणावर होता. बांगलादेशच्या शेवटच्या विकेटच्या जोडीला १९ चेंडूत सामना जिंकण्यासाठी १३ धावा हव्या होत्या. मिडविकेटवर क्षेत्ररक्षण करणारी कोनेल पोटाला धरून हळू हळू खाली पडताना दिसली. त्यानंतर, वैद्यकीय कर्मचारी मैदानात पोहोचेपर्यंत सहकारी खेळाडूंनी शामिलियाला सांभाळले. काही वेळाने खेळ पुन्हा सुरू झाला आणि वेस्ट इंडिजची कर्णधार स्टॅफनी टेलरने शेवटची विकेट घेत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.
बांगलादेश आणि वेस्ट इंडिज महिला क्रिकेट संघांदरम्यान माउंट माउंगानुई येथील बे ओव्हल स्टेडियमवर आज सामना खेळला गेला. बांगलादेशची कर्णधार निगार सुलतानाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या वेस्ट इंडिज संघाला ५० षटकांत ९ गडी बाद १४० धावाच करता आल्या. मात्र, हेली मॅथ्यूज, एफी फ्लेचर आणि कर्णधार स्टॅफनी टेलर यांच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर वेस्ट इंडिजला छोट्या लक्ष्याचा बचाव करता आला. बांगलादेशचा संघ ४९.३ षटकांत १३६ धावांत आटोपला.