गुडघ्याच्या दुखापतीतून सावरत पुनरागमन करणाऱ्या सायना नेहवालने हाँगकाँग सुपर सीरिज स्पर्धेत विजयी सलामी दिली. पुरुष गटामध्ये अजय जयराम आणि पारुपल्ली कश्यप यांनी अटीतटीच्या लढतींमध्ये विजय मिळवत दुसरी फेरी गाठली.
गुडघ्याच्या दुखापतीमुळे सायना चीन सुपर सीरिज स्पर्धेत सहभागी झाली नव्हती. विश्रांतीनंतर कोर्टवर परतणाऱ्या सायनाने इंडोनेशियाच्या अप्रिला युसवांडरीवर २२-२०, २१-८ अशी मात करत दुसरी फेरी गाठली. सुरुवातीला चाचपडणाऱ्या सायनाने पहिल्या गेमनंतर मात्र आक्रमक खेळ करत सामना जिंकला. नेटजवळून सुरेख खेळाबरोबरच स्मॅशचे ताकदवान फटके सायनाच्या विजयाचे वैशिष्टय़ ठरले.
अजय जयरामने रोमहर्षक लढतीत चीनच्या अव्वल मानांकित झेंगमिंग वांगला नमवत दुसऱ्या फेरीत स्थान पटकावले. त्याने वांगवर २२-२०, २३-२१ असा विजय मिळवला.
चुरशीच्या लढतीत कश्यपने जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानी असलेल्या डेन्मार्कच्या जॅन जोर्गनसेनवर मात केली. एक तास, आठ मिनिटे चाललेल्या लढतीत कश्यपने निग्रहाने खेळ करत जोर्गनसेनचे प्रत्येक फटक्याला तितकेच चांगले प्रत्युत्तर देत आव्हान मोडून काढत विजय मिळवला. त्याने जोर्गनसेनला २४-२२, २०-२२, २२-२० असे नमवले. पहिल्या गेममध्ये ०-३ने पिछाडीवर पडलेल्या कश्यपने त्यानंतर ११-८ अशी आघाडी मिळवली. ही आघाडी कायम राखत कश्यपने पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये जोरदार मुकाबला झाला आणि जोर्गनसेनने हा गेम जिंकत सामन्यातले आव्हान जिवंत राखले. तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये कश्यपने ११-१० अशी आघाडी घेतली. त्यानंतर कश्पय १९-१५ असा पुढे सरकला मात्र त्यानंतर जोर्गने संघर्ष केला, परंतु कश्यपने निर्धाराने खेळ करत शानदार विजय मिळवला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा