खांद्यावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच मैदानात उतरलेल्या भारताच्या सोमदेव देवबर्मनने एटीपी मियामी मास्टर्स टेनिस स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे. पहिल्या फेरीत सोमदेवने ७८व्या मानांकित इव्हजेनी डोनस्कोयवर अटीतटीच्या लढतीत ४-७, ७-६ (५) आणि ६-२ असा विजय मिळवला. जागतिक क्रमवारीत २५४व्या स्थानी असलेल्या सोमदेवने पहिला सेट ४-७ असा गमावला होता, पण दुसऱ्या सेटमध्ये जोरदार पुनरागमन करत त्याने डोनस्कोयशी ६-६ अशी बरोबरी केली आणि टायब्रेकर सहज दुसरा सेट जिंकत सामन्यात १-१ अशी बरोबरी केली. दुसरा सेट जिंकल्यावर सोमदेवचे मनोबल कमालीचे उंचावले आणि त्याचा परिणाम तिसऱ्या सेटमध्ये पाहायला मिळाला. तिसरा सेट ६-२ असा आरामात जिंकत त्याने सामना खिशात टाकला. दुसऱ्या फेरीत सोमदेवचा सामना ३४व्या मानांकित स्पॅनिआर्ड लोपेझबरोबर होणार आहे. सातव्या मानांकित भारताचा लिएण्डर पेस आणि त्याचा सहकारी मायकल लोद्रा यांचा पहिला सामना कास ख्रिस्तोफर आणि फिलिप कोल्सक्रेबरशी होणार आहे. भारताचा तिसरा मानांकित महेश भूपती आणि त्याचा सहकारी डॅनियल नेस्टोर यांचा पहिला सामना रिचर्ड गॅस्क्वेट आणि रॉजर व्हॅसेलिन यांच्याशी होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा