२०१८ वर्षात भारतीय हॉकी संघासमोर असलेली आव्हानं पाहून मुख्य प्रशिक्षक जोर्द मरीन यांनी संघासमोर एक ध्येय ठेवलं आहे. आशियाई खेळ आणि नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या हॉकी विश्वचषकाचं विजेतेपद पटकावून ऑलिम्पिकमध्ये आपलं स्थान निश्चीत करण्याचा भारतीय संघाचा मानस असणार आहे. या वर्षात भारताला सुलतान अझलन शहा चषक, राष्ट्रकुल, आशियाई खेळ आणि हॉकी विश्वचषक अशा महत्वाच्या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवायचा आहे.
अवश्य वाचा – मी संपलेलो नाही, माझ्यातला ‘सरदार’ अजुनही जागा – सरदार सिंह
मात्र जोर्द मरीन यांच्या दृष्टीने आशियाई खेळ आणि विश्वचषक या भारतीय संघासाठी सर्वात महत्वाच्या स्पर्धा ठरणार आहेत. आशियाई खेळ जिंकल्यास तुम्हाला ऑलिम्पिकमध्ये थेट प्रवेश मिळतो, असं झाल्यास २०२० टोकियो ऑलिम्पिकसाठी तयारी करायला आमच्याकडे दोन वर्षाचा कालावधी असेल. यामुळे सध्यातरी माझ्या संघासमोर ही स्पर्धा जिंकण्याचं ध्येय असल्याचं मरीन म्हणाले.
अवश्य वाचा – हॉकी विश्वचषकासाठी पाकिस्तानचा संघ भारतात येणार
भारतीय हॉकी संघाची सुत्र हाती घेतल्यानंतर जोर्द मरीन यांनी भारतीय संघासोबत वेगवेगळे प्रयोग करायला सुरुवात केली आहे. यातूनच महत्वाच्या स्पर्धांसाठी भारतीय हॉकी संघ तयार होईल असं मरीन यांचं मत आहे. मात्र यादरम्यान खेळाडूंच्या शाररिक तंदुरुस्तीबद्दल विचार करणंही तितकचं महत्वाचं असल्याचं मरीन यांनी स्पष्ट केलं. गेल्या काही स्पर्धांमध्ये मरीन यांनी सिनीअर खेळाडूंना विश्रांती देत तरुणांना संधी दिली. यातील काही खेळाडूंनी चांगली कामगिरी करत मरीन यांची शाबासकीही मिळवली. मरीन यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय हॉकी संघाचे आशिया चषकाचं विजेतेपद आणि वर्ल्ड हॉकीलीग फायनल स्पर्धेत पदकाची कमाई केली होती. त्यामुळे आगामी काळात भारतीय संघ मरीन यांच्या मार्गदर्शनाखाली कसा खेळ करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
अवश्य वाचा – हॉकी इंडियाला मिळालं ओडीशा सरकारचं प्रायोजकत्व, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ५ वर्षांचा करार