* इंग्लंडचा ऑस्ट्रेलियावर ४८ धावांनी विजय
* इयान बेलची शानदार ९१ धावांची खेळी
परिस्थिती प्रतिकूल असो किंवा अनुकूल आपल्या खणखणीत फलंदाजीच्या जोरावर प्रतिस्पध्र्यासाठी ‘धोक्याची घंटा’ वाजवणाऱ्या इयान बेलने चॅम्पियन्स करंडकाच्या पहिल्याच सामन्यात ९१ धावांची दणदणीत खेळी साकारल्यामुळे इंग्लंडला ऑस्ट्रेलियावर ४८ धावांनी विजय मिळवता आला. बेलच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडने ऑस्ट्रेलियापुढे २७० धावांचे आव्हान ठेवले होते. पण इंग्लंडच्या अचूक माऱ्याच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला २२१ धावाच करता आल्या.
इंग्लंडच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली नाही. २ बाद ४७ अशा अवस्थेनंतर कर्णधार जॉर्ज बेली फलंदाजीला आला आणि त्याने ५५ धावांची खेळी साकारत संघाच्या आशा जिवंत ठेवल्या. पण तो बाद झाला आणि ऑस्ट्रेलियाच्या संघाने सामना गमावला. जेम्स फॉल्कनरने नाबाद ५४ धावांची खेळी साकारत साऱ्यांचे मनोरंजन मात्र केले. जेम्स अॅन्डरसने ३० धावांत ३ बळी मिळवले.
तत्पूर्वी इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि इयान बेलने खणखणीत खेळी साकारत इंग्लंडच्या संघाला सावरण्याचे चोख काम केले. फॉर्मात असलेल्या बेलने दर्जेदार फलंदाजीचा नमुना पेश करत संघाची पडझड थांबवली आणि संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून देण्यात मोलाचा वाटा उचलला. बेलने सात चौकारांच्या जोरावर ९१ धावांची खेळी साकारली. जोनाथन ट्रॉट (४३) आणि रवी बोपारा (नाबाद ४६) यांनीही धावसंख्येत वाटा उचलला. पण अन्य फलंदाजांनी मात्र साफ निराशा केली. बेल बाद झाला तेव्हा ३८ व्या षटकात इंग्लंडची ३ बाद १८९ अशी धावसंख्या होती, पण यानंतर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी इंग्लंडच्या धावांना वेसण घालण्यात यश मिळवले आणि त्यांना २६९ धावांवर रोखले.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड : ५० षटकांत ६ बाद २६९ (इयान बेल ९१, रवी बोपारा नाबाद ४६; क्लिंट मकाय २/३८) विजयी वि. ऑस्ट्रेलिया : २० षटकांत ९ बाद २२१ (जॉर्ज बेली ५५, जेम्स फॉल्कनर नाबाद ५४; जेम्स अॅन्डरसन ३/३०.)
सामनावीर : इयान बेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा