*    सनरायजर्सचा दिल्लीवर तीन विकेट्सनी विजय
*    डेअरडेव्हिल्सचा सलग चौथा पराभव
दिल्ली डेअरडेव्हिल्सचे माफक धावांचे आव्हान पेलतानाही हैदराबाद सनरायजर्सला घाम फुटल्याने शुक्रवारचा सामना निसरवाणा ठरला. कर्णधार कुमार संगकारा आणि अमित मिश्रा यांनी उपयुक्त योगदान देत गोलंदाजांच्या कामगिरीवर शिखर चढवण्याचे काम केल्यामुळे हैदराबादला तीन विकेट्स राखून हा विजय साकारला आला. पदार्पणाच्या मोसमातच धडाकेबाज कामगिरीचे प्रदर्शन करून हैदराबादने तिसऱ्या विजयासह आयपीएल गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. दिल्लीला मात्र सलग चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले.
दिल्लीचे लक्ष्य गाठताना हैदराबादची १५व्या षटकांत ५ बाद ७१ अशी बिकट अवस्था झाली होती. ६ चेंडूंत सहा धावांची आवश्यकता असताना डेल स्टेनने एक चौकार लगावून दोनच चेंडूत सामना संपवला. तळाच्या अमित मिश्राने केलेल्या फटकेबाजीमुळे हैदराबादला रडतखडत का होईना, पण विजयाची नोंद करता आली. हैदराबादची सुरुवातही खराब झाली होती. त्यांना दुसऱ्याच षटकात अक्षत रेड्डीच्या (१) रूपाने पहिला धक्का बसला. पार्थिव पटेल आणि कर्णधार कुमार संगकारा यांनी दुसऱ्या विकेटसाठी ४४ धावांची भर टाकली. पण शाहबाझ नदीमने स्वत:च्याच गोलंदाजीवर अप्रतिम झेल पकडत पार्थिवचा अडसर दूर केला. पार्थिवने १९ चेंडूंत ४ चौकारांसह १९ धावा केल्या. संगकाराने २८ धावांचे योगदान दिले. मात्र बोथाच्या गोलंदाजीवर सेहवागने त्याचा पहिल्या स्लिपमध्ये सुरेख झेल पकडला. शाहबाझ नदीम आणि मॉर्ने मॉर्केल यांनी प्रत्येकी दोन विकेट्स मिळवत सामना रंगतदार स्थितीत आणून ठेवला. हनुमा विहारी (१७), कॅमेरून व्हाइट (४) आणि आशिष रेड्डी (१६) यांना मैदानावर ठाण मांडण्यात अपयश आले. पण अमित मिश्राने हैदराबादला विजयाची वाट दाखवून दिली. मिश्राने नाबाद १६ धावांची खेळी केली.
तत्पूर्वी, डेल स्टेन, इशांत शर्मा व थिसारा परेरा यांच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर हैदराबाद सनरायझर्स संघाने दिल्ली डेअरडेव्हिल्सला २० षटकांत ८ बाद ११४ धावांवर रोखले. वीरेंद्र सेहवाग संघात परतल्यानंतरही दिल्लीला घरच्या मैदानावर आव्हानात्मक धावसंख्या रचण्यात अपयश आले.
फिरोजशाह कोटला मैदानावरील या लढतीत पहिल्या सत्रात गोलंदाजांचेच वर्चस्व राहिले. पहिल्याच षटकांत डेल स्टेनने धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नरला शून्यावर बाद करत दिल्लीच्या डावाला खिंडार पाडले. तेथूनच दिल्लीच्या डावाची पडझड झाली. सेहवाग (१२) व महेला जयवर्धने (१२) या दोघांना एकाच षटकात बाद करत इशांत शर्माने दिल्लीकरांना आणखी धक्के दिले. मनप्रीत जुनेजा (१५) व जोहान बोथा (९) यांनी केवळ हजेरी लावण्याचे काम केले.
इरफान पठाण आणि केदार जाधव यांनी दिल्लीची घसरगुंडी काही अंशी थोपविली. त्यांनी सहाव्या विकेटसाठी ३० धावांची भागीदारी रचत दिल्लीला नीचांकी धावसंख्येपासून वाचविले. पठाण (२३) बाद झाल्यानंतर पुन्हा दिल्लीची घसरगुंडी उडाली. तथापि, एका बाजूने केदार जाधवने आक्रमक व आत्मविश्वासाने फटकेबाजी केली. त्यामुळेच दिल्लीस तीन आकडी धावसंख्या उभारता आली. जाधवने २० चेंडूंत एक चौकार व दोन षटकारांसह सर्वाधिक नाबाद ३० धावा केल्या. हैदराबादकडून स्टेनने केवळ ११ धावांमध्ये दोन बळी मिळविले. इशांत, परेरा यांनीही प्रत्येकी दोन बळी टिपले.
संक्षिप्त धावफलक
दिल्ली डेअरडेव्हिल्स : २० षटकांत ८ बाद ११४ (केदार जाधव ३०, इरफान पठाण २३; डेल स्टेन २/११, थिसारा परेरा २/३१) पराभूत वि. हैदराबाद सनरायझर्स : १९.२ षटकांत ७ बाद १११ (कुमार संगकारा २८, पार्थिव पटेल १९; शाहबाझ नदीम २/१७, मॉर्ने मॉर्केल २/२७). सामनावीर : अमित मिश्रा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आर. अश्विन, चेन्नई सुपर किंग्जचा गोलंदाज
अखेर वीरू पाजी आयपीएलमधील पहिला सामना खेळला. पण सेहवागसाठी डेल स्टेनही तोफगोळे घेऊन सज्ज झाला होता. स्टेनसाठी चेंडूचे रूप कधीच बदलत नाही. त्याच्यासाठी चेंडू कायम नवीनच असतो.

आर. अश्विन, चेन्नई सुपर किंग्जचा गोलंदाज
अखेर वीरू पाजी आयपीएलमधील पहिला सामना खेळला. पण सेहवागसाठी डेल स्टेनही तोफगोळे घेऊन सज्ज झाला होता. स्टेनसाठी चेंडूचे रूप कधीच बदलत नाही. त्याच्यासाठी चेंडू कायम नवीनच असतो.