वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) फायनलमध्ये भारताला ऑस्ट्रेलियाकडून २०९ धावांनी पराभव स्वीकारावा लागला आहे. लंडनच्या ओव्हल मैदानावर खेळवण्यात आलेला हा सामना जिंकण्यासाठी भारताला ४४४ धावांची गरज होती. पण पाचव्या दिवशी लंच ब्रेकपूर्वी भारताचा संपूर्ण संघ २३४ धावांवर बाद झाला. या पराभवामुळे टीम इंडियाचे आयसीसी विजेतेपदाचे स्वप्न पुन्हा भंगले. भारताने यापूर्वी २०१३ मध्ये शेवटचं ICC विजेतेपद पटकावलं होतं.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) फायनलमध्ये झालेल्या पराभवानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माला नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगचा सामना करावा लागला. अनेक दिग्गज खेळाडूंनीही भारतीय संघाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अशी एकंदरीत स्थिती असताना भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने रोहित शर्माची पाठराखण केली आहे. विश्वचषक जिंकण्यापेक्षा आयपीएल जिकणं कठीण आहे, असं विधान सौरव गांगुलीनं केलं. ‘आज तक’ला दिलेल्या मुलाखतीत त्याने हे विधान केलं.
यावेळी गांगुलीने विराट कोहलीबरोबरच्या कर्णधारपदाच्या वादावरही भाष्य केलं. दक्षिण आफ्रिकेबरोबरची मालिका संपल्यानंतर विराट कोहलीने स्वतः कसोटी कर्णधारपद सोडल्याचं गांगुलीने सांगितलं. तसेच त्यांनी भारतीय क्रिकेट कर्णधार रोहित शर्माचं कौतुकही केलं.
सौरव गांगुली म्हणाला, “विराट कोहलीच्या कर्णधारपदाच्या वादावर आता बोलून काही फायदा नाही. विराटने कसोटी कर्णधारपद सोडण्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार नव्हतो. हा सर्वस्वी कोहलीचा निर्णय होता. त्यामुळे त्यावेळी कुणाला तरी कर्णधार बनवायचं होतं. अशात रोहित शर्मा हा सर्वोत्तम पर्याय आमच्यासमोर होता. माझा रोहितवर खूप विश्वास आहे. पाच वेळा आयपीएल जिंकणं ही फार मोठी गोष्ट आहे. विश्वचषक जिंकण्यापेक्षा आयपीएल जिंकणं कठीण आहे. आयपीएलमध्ये प्रत्येक संघाला १४ सामने खेळावे लागतात. त्यानंतर ‘प्लेऑफ’ सामने खेळवले जातात. त्यामुळे मला विश्वास आहे की, कर्णधार म्हणून रोहित हा अजूनही सर्वोत्तम पर्याय आहे.”