अव्वल मानांकित पी.व्ही. सिंधूने लौकिकाला साजेसा खेळ करीत मलेशिया ग्रां.प्रि. बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली. सिंधूने पहिल्या फेरीत सिंगापूरच्या चेना जिआयूनचा पराभव केला. त्याचबरोबर भारताच्या गुरुदत्तसाई यानेही विजय मिळवीत पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे.
अटीतटीच्या लढतीत सिंधूने चेनाचा २१-१३, १९-२१, २१-१३ असा ४७ मिनिटांमध्ये पराभव करीत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. पहिल्या गेममध्ये सिंधूने आक्रमक खेळ केला आणि पहिला गेम २१-१३ असा सहजपणे जिंकला. पण दुसऱ्या फेरीत चेनाने सिंधूवर कुरघोडी करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. दुसऱ्या गेममध्ये चेनाने आक्रमणाबरोबरच बचावावर भर देत २१-१९ असा गेम जिंकत सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली. निर्णायक तिसऱ्या गेममध्ये सिंधूने अनुभव पणाला लावत चेनाला २१-१३ असे पराभूत करीत सामना जिंकला. सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीतील सामना हाँगकाँगच्या चेआँग नान यीबरोबर होणार आहे.
पुरुषांमध्ये उपउपांत्यपूर्व फेरीत भारताच्या आर.एम.व्ही. गुरुसाईदत्त, समीर वर्मा आणि के. श्रीकांत यांनी स्थान पटकावले आहे.
गुरुदत्तसाईने यजमान देशाच्या जिअ‍ॅप चिन गोहचा २१-८, २१-९ असा धुव्वा उडवला. समीर वर्माने वेई फेंग चोंगचा अटीतटीच्या लढतीत २१-१५, १६-२१, २१-१९ असा पराभव केला. के. श्रीकांतने सुपानयू अव्हिहिंगसॅनोनवर २१-९, २१-१९ असा ३६ मिनिटांमध्ये विजय मिळवला.

Story img Loader