महाराष्ट्राच्या प्रज्ञा गद्रे आणि अक्षय देवलकर यांनी ऑल इंग्लंड अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या पात्रता फेरीत दोन विजयांसह दणक्यात सलामी दिली. अश्विनी पोनप्पाच्या साथीने महिला दुहेरीत तर मिश्र दुहेरीत अक्षयच्या साथीने खेळताना प्रज्ञाने विजय मिळवला. अक्षयने प्रज्ञासह मिश्र दुहेरीत तर प्रणव चोप्राच्या साथीने पुरुष दुहेरीत विजय  संपादला.
अन्य लढतींमध्ये, आनंद पवार आणि आरएमव्ही गुरुसाईदत्तला पराभवाला सामोरे जावे लागले. पराभवामुळे या दोघांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. युवा बॅडमिंटनपटू सौरभ वर्माने चुरशीच्या लढतीत विजय मिळवला.
प्रज्ञाने अश्विनी पोनप्पा या राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेत्या खेळाडूसह महिलांच्या दुहेरीत सहज विजय मिळविला. त्यांनी वेल्सच्या सराह थॉमस व कॅरिसा टर्नर या जोडीचा २१-८, २१-१२ असा दणदणीत पराभव केला. प्रज्ञा-अक्षय जोडीने तैवानच्या चिया बिनलिऊ व यालान चांग यांच्यावर २१-१२, २१-१३ अशी मात केली. पुरुष दुहेरीत अक्षय-प्रणव जोडीने अ‍ॅडम क्वालिना-रेझमस्लायव्ह वाचा जोडीवर २१-१८, २१-१५ अशी मात केली. अरुण विष्णू व अपर्णा बालन यांना पहिल्याच लढतीत पराभवाचा धक्का बसला. दक्षिण कोरियाच्या सोयोंग किम व सांग जुआन ली यांनी त्यांचा १९-२१, २१-९, २१-१९ असा पराभव केला. पुरुष एकेरीत सौरभ वर्माने ब्राईस लिव्हर्डेझ या फ्रान्सच्या खेळाडूवर २२-२०, २३-२१ असा रोमहर्षक विजय मिळविला. इंग्लंडच्या राजीव औसेफने आनंद पवारवर २०-२२, २३-२१, २१-७ असा विजय मिळविला.
प्राजक्ता सावंतला व्हिसा नाकारल्याने उच्च न्यायालय नाराज
मुंबई : बॅडमिंटनपटू प्राजक्ता सावंतला ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व्हिसा नाकारल्याबाबत उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा आणि न्यायमूर्ती अनूप मोहता यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी मंगळवारी सुनावणी झाली. व्हिसा न मिळाल्यामुळे प्राजक्ताची लंडनवारी मुकल्याचे प्राजक्तातर्फे सांगण्यात आले. त्यावर ही बाब अत्यंत दुर्दैवी असल्याचे मत नोंदवून जर केंद्र सरकारने तिच्या व्हिसाचा मार्ग मोकळा करून देण्याचे ठरविले असते, तर नक्की ती या स्पर्धेत सहभागी होऊ शकली असती, असा टोला न्यायालयाने हाणत तीव्र नाराजी व्यक्त केली.